मंगळवेढा तालुक्यात शैलाताई गोडसे यांच्या प्रचाराचा झंझावात
मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्याचा पर्यायाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी एकवेळ विधानसभेत तुमच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याची संधी द्या असे मत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार शैलाताई गोडसे यांनी केले आहे. मंगळवेढा तालुक्यात शहर व ग्रामीण भागात शैलाताई गोडसे या प्रचारादरम्यान बोलत होत्या. मंगळवेढा तालुक्यातील माचणूर, ब्रह्मपुरी, बठाण उचेठाण, मुढवी, धर्मगाव, ढवळस, देगाव, मल्लेवाडी, घरनिकी, मारापुर, अकोला, गणेशवाडी, शेलेवाडी, महमदाबाद, लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव आणि मंगळवेढा शहर या ग्रामीण भागांमधून शैलाताई गोडसे यांच्या प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या होत्या.
गोडसे पुढे म्हणाल्या, एक जिल्हा परिषद सदस्य असतानाही मी मंगळवेढा तालुक्याच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवून त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. लोकप्रतिनिधींनाही अनेक प्रश्न सुटले नाहीत असे प्रश्न आणि पाठपुरावा केल्यानंतर सुटण्याच्या मार्गावर आहेत. मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्याचे अनेक प्रलंबित असणारे प्रश्न मला सोडवायचे आहेत पण त्यासाठी तुम्ही जर विधानसभेत जाण्याची संधी दिली तर त्या प्रत्येक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. शेतकरी,कामगारांचे प्रश्न, ऊस उत्पादकांचे ऊसदराचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न ,साखर कारखाना कामगारांचा थकीत वेतनाचे प्रश्न असे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. दरम्यान मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागामधून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा बदल हवा अशी चर्चा ग्रामीण भागात भागातील जनतेमध्ये सध्या सुरू आहे.