टीम संवाद : मंगळवेढा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बठाण येथील शिक्षक शिवश्री प्रकाश जावळे गुरुजी हे सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त मराठा वधुवर सुचक कक्षाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. गुलाब पुष्प व पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार दिलीप जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. प्रकाश जावळे बठाण शाळेतून सेवानिवृत्त झाले असून 28 वर्षे त्यांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा केली. परखड विचार आणि परिश्रमाची जोड देत जावळे यांनी सामाजिक कार्य केले आहे. यापूर्वी त्यांनी वृत्तपत्रातून शाहू, फुले,आंबेडकर यांचे विचार समाजापुढे निडरपणे मांडले आहेत. तसेच त्यांनी बामसेफचे तालुकाध्यक्ष व अंनिसचे कार्याध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले आहे. यापुढे सामाजिक कार्यासाठी लेखन व प्रबोधन करण्याचा मानस त्यांनी या सत्कारप्रसंगी व्यक्त केला. यावेळी हरी माने, प्रदीप परकाळे, गणेश यादव आदी उपस्थित होते.