मंगळवेढा प्रतिनिधी : राजा बळी म्हणजे प्रजेतील प्रत्येकाला त्याच्या श्रमाचा योग्य हिस्सा विभागून देणारा संविभागी. शोषक व्यवस्था नाकारताना एक भावात्मक, सकारात्मक, क्रियाशील समाजरचना घडवून आणणारा समाजशिल्पकार, कारस्थानांना आणि कपटांना निर्मळ-निरागस मनाने सामोरा जाणारा उन्नत महामानव म्हणूनही भारतभूमीच्या आदरस्थानी असलेला हा बळी राजा. म्हणूनच आपल्या पारंपरिक दिवाळी सणाच्या उत्सवातही राजा बळीचेच स्मरण पुन्हा पुन्हा केले जाते. इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे ही इथल्या मायमातीतल्या लेकरांची भूमिका बळीराजाच्या विषयीची अपार कृतज्ञता व्यक्त करणारी गोष्ट आहे. त्याचेच स्मरण म्हणून कृषीसंस्कृतीत हा सण शेणामातीच्या वासाने दरवळतो.
बळी सात काळजांच्या आत जपून ठेवावा, असा निरागस माणूस...असे बळीराजाचे वर्णन डॉ. आ. ह. साळुंखे करतात. त्यांचा बळीवंश हा ग्रंथ त्या दृष्टीने बळीचा इतिहास समजून घेणासंदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे. बळी हिरण्यकशिपूचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व. सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट, एक महातत्त्ववेत्ता.
बळीचा वंश तो बळीवंश. या वंशातील माणसे- आपली माणसे, आपल्या रक्तामांसाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले, पण तत्त्वांशी द्रोह केला नाही, आपल्या श्वासोच्छवासांवर दडपणे लादून घेणे मान्य केले नाही, अशी माणसे म्हणजे बळीवंशातील माणसे.
अशा महान बळीराजाच्या स्मृती जागृत करण्याचे औचित्य साधून मंगळवेढा येथे बळी राजास अभिवादन करण्यात आले. कृषीप्रधान भारतातल्या प्रजेचे प्रतिनिधीत्त्व करणार्या आदर्श राजाचा सन्मान कृषी परंपरेतील पाच धान्यांचे पूजन करून करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थिताकडून राजा बळीच्या प्रतिमेस मारूती गोवेसाहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बळीराजास अभिवादन करण्यास रामचंद्र हेंबाडे, गणेश यादव सर, अनील पाटील, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी शिवाजी सातपुते आणि कवी इंद्रजित घुले, अभिजित शिंदे, भारत शिंदे, बाळासाहेब सावंत, आप्पा मुढे, समाधान क्षीरसागर, दिलीप जाधव, प्रकाश मुळीक, प्रदीप परकाळे, तुकाराम भगरे आदी मान्यवर उपिस्थत होते. कवी इंद्रजित घुले, प्रकाश मुळीक यांनी अभिवादनपर मनोगते व्यक्त केली. भारत शिंदे गुरुजी यांनी आभार मानले.