नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाची भूमिका, तसेच उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक गुरुवारी दिल्ली दरबारी झाली. जागांच्या मुद्यावर अडून बसलेल्या शिवसेनेला चार ते पाच जागा वाढवून देण्याची तयारी भाजपाने केली आहे . दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह , कार्यकारी अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, राष्ट्रीय संघटनमंत्री बी . एल. संतोष, महासचिव भूपेंद्र यादव , तसेच महाराष्ट्र भाजपा प्रभारी सरोज पांडे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील , सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन या मंत्र्यांसह भाजपाचे संघटनमंत्री विजय पुराणिक उपस्थित होते .
शिवसेनेसोबत करावयाच्या युतीसह महाराष्ट्रातील भाजपाचे उमेदवार निश्चित करण्याबाबत या बैठकीत व्यापक विचारमंथन करण्यात आले . दुपारी १२ .३० वाजता सुरू झालेली बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
शिवसेनेसोबत युती झाल्यानंतरची भूमिका, तसेच युती झाली नाही, तर भाजपाची भूमिका या दोन्ही मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. भाजपाने शिवसेनेसमोर १२० जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, शिवसेनेची १२५ ते १३० जागांची मागणी आहे. भाजपा आणखी चारपाच जागा शिवसेनेला वाढवून देऊ शकतो. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांची युती झाली नव्हती. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र आले होते. यावेळीही तसे झाले, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
विदर्भ , मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि कोकणातील भाजपाच्या उमेदवारांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रविवार २९ सप्टेंबरला होत आहे, या बैठकीत हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार असल्याचे समजते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांची युती होणार असून, युती राज्यातील किमान २२० जागा जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला आहे.
प्लॅन बी स्वबळाचा
१८ जागा युतीतील मित्रपक्षांसाठी सोडत किमान १५० जागा लढवण्याची भाजपाची भूमिका आहे . अटीतटीच्या परिस्थितीत भाजपा आपल्या चारपाच जागा कमी करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. काही कारणाने युती झाली नाही, तर 'प्लान बी' म्हणून भाजपाने राज्यातील सर्व म्हणजे २८८ जागा स्वबळावर लढवण्याचीही तयारी केली असल्याचे समजते.