दुष्काळग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी आम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना आले यश -शैला गोडसे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

दुष्काळग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी आम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना आले यश -शैला गोडसे

   
                                                                                            मंगळवेढा(प्रतिनिधी) गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत मंगळवेढा तालुक्यातील आठ गावांचा नव्याने समावेश करण्यासाठी या भागातील शेतकरी व आम्ही रात्रंदिवस पाठपुरावा करत आहोत. आणि आज दुष्काळग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी आम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाल्याचे पाहून मनापासून समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी मंगळवेढा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मंगळवेढा येथील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तुकाराम भोजने, तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे, नारायण गोवे, सलीम खतीब, विनोद कदम, सलगर बुद्रुकचे उपसरपंच रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गोडसे म्हणाले, आम्ही गेल्या दोन वर्षापासून मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागाचा दुष्काळ कमी करण्यासाठी कोणकोणत्‍या उपाय योजना कराव्यात यासाठी प्रयत्न करत आहोत. यादरम्यान म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यातील लवंगी, आसबेवाडी, सलगर (खू.), सलगर (बु), शिवनगी, सोड्डी, येळगी, हुलजंती या गावांच्या सीमेवरून जाते पण या गावांना त्याचा लाभ होत नसल्याचे आमच्या लक्षात आले. गावाच्‍या सीमेवरून पाणी जात असून त्याचा आपल्याला लाभ होत नसल्याचे पाहून या भागातील शेतकरी आक्रमक झाले होते. आम्ही तेव्हापासून या अतिरिक्त गावांचा समावेश करण्यासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री ना. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले यावेळी या भागातील अनेक शेतकरी आमच्यासोबत होते. या भागातील अनेक शेतकरी याचे साक्षीदार आहेत. याकामी जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन व जलसंपदा राज्यमंत्री ना. विजय शिवतारे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. आणि म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यातील समावेश असलेल्या प्रत्येक गावाला मिळेपर्यंत आमचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचेही यावेळी गोडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

फोटो ओळी
मंगळवेढा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शैला गोडसे यावेळी उपस्थित मान्यवर
test banner