प्रतिनिधी:-
पाणी प्रश्नाशी निगडित सर्व बाबींचा संतुलितपणे विचार करून शाश्वत पद्धतीने पाण्याच्या नियोजनाला भूजल शास्त्राची जोड द्यायला हवी.
यासाठी जलसाक्षरतेची गरज असून प्रत्येक गावात जलसाक्षरते विषयी सजगता महत्त्वाची आहे.गावातील पाण्याचे स्त्रोत शाश्वत राखण्यासाठी ग्रामस्थांचेही योगदान महत्त्वाचे आहे आणि शेती मध्ये पाण्याचा योग्य वापर गरजेचाच आहे,असे प्रतिपादन ॲग्रीकॉस एक्सपोर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर अजय आदाटे यांनी येथील जलसाक्षरता प्रशिक्षण शिबिरात व्यक्त केले.
गावा-गावात ग्रामस्थांना मुबलक प्रमाणात शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, तसेच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे.
या योजनांवर गावोगावी कोट्यवधीचा खर्च देखिल झाला. या योजनांच्या माध्यमातून दुर्मिळ वाडीवस्तीत पाणी पुरवठा होण्यास मदत झाली. गावा- गावात वारंवार पाणी योजना राबवणे शक्य नाही.
त्यासाठी केलेल्या योजना दीर्घकाळ टिकाव्यात,त्यावर ग्रामस्थांची देखरेख रहावी,कधी दुरूस्ती निघाल्यास तातडीने ती व्हावी, योजनेच्या ठिकाणी पाणीसाठे असावेत.
पाण्याचा योग्य वापर व्हावा.यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गटनिहाय जलसाक्षरता शिबीर घेण्यात येत आहे.मंगळवेढा येथील पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील विविध संवर्गातील पदाधिकाऱ्यांसाठी हे दोन दिवसायी अनिवासी शिबीर घेण्यात आले.
शिबिराच्या प्रशस्तीपत्रक वाटप प्रसंगी अजय आदाटे यांनी सखोल मार्गदर्शन केले.त्यांनी मानवी जिवनातील पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले.पाण्याचा समज व उमज वाढावी,पाण्याचा नेमका वापर व्हावा व पाणी पुरवठ्या सोबत गरजा मर्यादित आणि कमी करण्याकडे लोकांचा कल वाढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुबारक शेख यांनी जलजीवन मधून साकारलेल्या पाणी योजनांच्या देखभाल दुरूस्तीसाठी प्रत्येक गावात लोकांची निवड करण्यात येत आहे व या पदाधिकाऱ्यांचे योजनेवर लक्ष राहणार आहे असे सांगितले.
दीर्घकाळानंतर पाणी योजनांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मिळाला आहे.त्यामुळे या योजना दीर्घकाळ टिकण्याची गरज आहे. गावात पाणीसाठा वाढण्यासाठी सामूहिक योगदान गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन करण्यात आले. शिबिरास आयेशा शेख या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या होत्या.मंगळवेढा मधील स्वच्छ भारत मिशनच्या इसाक शेख यांनी प्रास्ताविक आणि उमेश भोसले यांनी कार्यक्रम सूत्रसंचालन केले. राधिका कंगोरे यांनी आभार मानले.