मंगळवेढा:-
मंगळवेढेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असणाऱ्या विषयापैकी संत चोखामेळा स्मारक हा एक महत्वाचा विषय असून त्या स्मारकासंदर्भात चर्चा-विनिमय करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी ५ वाजता नगर परिषद येथील सभागृहात सर्व मंगळवेढेकरांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संत चोखामेळा समाधी मंदीर समितीचे अध्यक्ष जयराज शेंबडे यांनी दिली आहे.
तब्बल १८ वर्षांहून अधिक काळ मागणी होत असलेल्या मंगळवेढयातील संत चोखामेळा यांच्या स्मारकचा विषय शासन दरबारी पडून आहे विशेष म्हणजे २०१७ साली विधिमंडळात चर्चाही झाली होती.
अनेक लोक भाषणात संत चोखामेळा यांच्या अभंगाचा उल्लेख करतात मात्र चोखोबांच्या स्मारकाविषयी उदासीन दिसतात दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर पासून अगदी समीप असलेल्या मंगळवेढा संत भूमीत अनेक संत होऊन गेले म्हणूनच या भूमीला संतभूमी म्हटले जाते याच भूमीत संत चोखबारायांनी काम करताना आपल्या अवीट भक्तीने विठ्ठलाचे लाडके भक्त होण्याचा बहुमान प्राप्त केला होता मात्र याच लाडक्या भक्ताच्या स्मारका बाबतीत शासन वेळकाडूपणा करीत आहे.
त्यामुळे मंगळवेढ्यातील व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातुन तीव्र संताप व्यक्त होत आहे तरी सदर स्मारकामुळे मंगळवेढ्याच्या सौंदर्यात भर पडणार असून पर्यटन विकासाला देखील चालना मिळणार आहे.
आता जनतेतुनच तीव्र पाठपुरावा करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंदीर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.