देशात आज, दि.25 जानेवारी 2024 रोजी “14 वा राष्ट्रीय मतदार दिवस” राज्य, जिल्हा, मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्यात येणार आहे.
भारतात दि. 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. हा दिवस देशभर “राष्ट्रीय मतदार दिवस” म्हणून साजरा केला जातो. या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपल्या देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे.
भारत लोकशाही प्रधान देशात मतदार हाच खऱ्या अर्थाने राजा आहे. मतदारांमध्ये जनजागृती करणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे, हे या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने अधोरेखित करायला हवे.
नवीन मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी तसेच नवीन मतदारांनी आपल्या नावाची मतदार यादीत नोंदणी करावी, या गोष्टींची जनजागृती होण्यासाठी आपले कर्तव्य म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. नागरिकांचे निवडणुकीत योगदान वाढावे, याकरिता भारत सरकारने सन-2011 पासून “राष्ट्रीय मतदार दिन” साजरा करण्याचा निर्णय घेतला.
आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या लोकशाही राज्यपद्धतीने प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन आजच्या या दिवसानिमित्त करण्यात येत आहे.
गणराज्य दिनाच्या एक दिवस आधी “राष्ट्रीय मतदार दिन” साजरा करण्यामागचे कारण असे की, भारत निवडणूक आयोगाची स्थापना दि. 25 जानेवारी 1950 रोजी झाल्याने हा दिवस देशभर “राष्ट्रीय मतदार दिवस” म्हणून साजरा केला जातो. दि. 26 जानेवारी 1950 च्या (प्रजासत्ताक दिन) आधी एक दिवस निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. जगातील सर्वात यशस्वी लोकशाही म्हणून आपल्या भारत देशाकडे पाहिले जाते. ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजे मतदारांचा मोलाचा सहभाग आहे. कारण भारतीय लोकशाहीत मतदारच मतदानाद्वारे लोकप्रतिनिधींची निवड करीत असतात.
आपल्या देशातील लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे.
मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन स्तरावरून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवीन मतदारांमध्ये जागृतीसाठी या निमित्ताने जिल्ह्यात विविध स्पर्धा, जनजागृतीचे कार्यक्रमही शालेय, महाविद्यालयीन पातळीवर आयोजित करून गाव, तालुका व जिल्हास्तरावरही भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपले नाव मतदारयादीत नोंदविणे आवश्यक आहे. कारण आपले नाव मतदार यादीत न नोंदविल्यामुळे संबंधित मतदार मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित राहतात. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा पवित्र हक्क आणि सामाजिक कर्तव्यही आहे. लोकशाही प्रबळ, मजबूत व भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे.
वय वर्षे 18 ते 19 या वयोगटातील युवकांच्या मतदानाचे प्रमाण सध्याच्या जास्तीत जास्त व्हावे, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मतदारांची नोंदणी वाढविण्याकरीता विद्यापीठे, महाविद्यालये आणि त्यांचे युवक प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधण्यात येतो. विद्यापीठ तसेच महाविद्यालयांमार्फत नवीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व पटवून त्यांना योग्य मार्गदर्शन करुन या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळण्यासाठी त्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्यात येते.
मतदार नोंदणी आवश्यक का ?
◆ वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर आपले नाव मतदारयादीत नोंदणी करणे महत्त्वाचे…
◆ लोकशाही प्रधान भारत देशात मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजले जाते… यासाठी मतदान नोंदणी आवश्यक.
◆ आपण आपला मनपसंत उमेदवार आपल्या मतनोंदणीमुळे निवडून आणू शकतो… यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे…
◆ माझे एक मत देण्याने काही फरक पडणार नाही, हा आपला गैरसमज असून आपले मतदान अमूल्य आहे… यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे.
◆ लोकशाही प्रधान भारत देशात प्रत्येक भारतीय नागरिकांना निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे… यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे.
◆ देशाच्या प्रगतीत युवकांचे/नागरिकांचे योगदान वाढावे… यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे.
चला तर मग… राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून सर्वांनी मिळून शपथ घेवू या…!
♦️राष्ट्रीय मतदार दिनी मतदारांनी घ्यावयाची शपथ :
“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू. प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.”