राज्यात आणि केंद्रात भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेते भाजपमध्ये घेऊन क्लीन चीट दिली जाते त्याच पद्धतीने मंगळवेढ्यात सुद्धा शेतकऱ्यांची लाखो रुपयाची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला भाजपने पक्षात घेऊन जिल्ह्याचे नेते पद दिले आहे. असे प्रतिपादन ॲड राहुल घुले यांनी मोर्चाला संबोधित करताना केले.
लक्ष्मी कृषी विकास प्रोडूसर कंपनीच्या संचालकांनी मंगळवेढ्यातील अनेक शेतकऱ्यांना विदर्भ कोकण बँकेचे कर्ज देतो म्हणून फसवणूक केल्याचा 420 चा गुन्हा 26 जानेवारी 2021 रोजी दाखल होऊन सुद्धा अद्याप पर्यंत तपास पूर्ण केला नाही. चार्जशीट दाखल केले नाही म्हणून प्रांत कार्यालय मंगळवेढा या ठिकाणी गेले सहा दिवसापासून उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. सदरचा मोर्चा दामाजी चौकापासून सुरुवात होऊन प्रांत कार्यालय मंगळवेढा या ठिकाणी समारोप करण्यात आला. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट), प्रहार अपंग संघटना, शरद जोशी शेतकरी संघटना, सजग नागरिक संघटना यांनी मोर्चा हजेरी लावत पाठिंबा जाहीर केला.
यावेळी समाधान फाटे, संजय कट्टे, दत्तात्रय खडतरे, सिद्राया माळी, अमोल शिंदे, मुजमील काझी, जमीर इनामदार यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादीचे चंद्रशेखर कोंडूभैरी, पाणी चळवळीचे नेते भारत पवार, शेतकरी संघटनेचे नेते सिद्धेश्वर हेंबाडे, श्रीमंत केदार, मोठ्या प्रमाणात महिला व शेतकरी उपस्थित होते.