आज २० डिसेंबर, गाडगेबाबा यांचा पुण्यस्मरण दिवस, त्यांचे बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर अण्णा यांचे खूपच घनिष्ठ संबंध होते.
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा अभंग कानावर पडल्यावर महाराष्ट्रातल्या माणसाला आपसुकच संत गाडेगबाबा यांची आठवण येते. संत गाडगेबाबांनी शिक्षण, स्वच्छता, भूतदया, अंधश्रद्धेवर प्रहार या तत्त्वावर आयुष्यभर काम केलं.
आधी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण, पुढच्या 14 दिवसात गाडगेबाबा गेल्याची बातमी आली अनं कर्मवीर भाऊराव पाटील ढसाढसा रडले.
कर्मवीर भाऊराव पाटील या माणसाने शिक्षण ग्रामीण भागात पोहचवले नसते, तर महाराष्ट्राची काय अवस्था झाली असती कल्पना करायला नको. पण हे काम इतकं सोपं नव्हतं. गोर गरीब पोरांना शिकवण्यासाठी कर्मवीर अण्णांना आयुष्यभर झिजावं लागलं. शाहू महाराज यांना भाऊरावांच्या कामाचं नेहमीच कौतुक आणि पाठबळ होतं. १९१९ ला रयतची स्थापना झाली. तेव्हापासून स्वतःकडे असेल नसेल तेवढं भाऊरावांनी मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला. वेळोवेळी पैसे कमी पडत तरी भाऊराव न खचता काम करत गेले. रयतचा विस्तार वाढू लागला पण अडचणी वेगवेगळ्या रूपात येतच होत्या. त्यांच्या पाठीशी खंभीर असणारे शाहू महाराज राहिले नव्हते. अशा वेळी अनुदान बंद झाल्याच्या कठीण प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मदतीला संत गाडगेबाबा धावून आले.
गांधी हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून अनुदान बंद झाले.
बाळासाहेब खेर तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. गांधी हत्येननंतर बाळासाहेब खेर यांनी पुण्यातील ब्राह्मण मंडळींना एकत्र घेऊन त्यांना संरक्षणाची हमी दिली होती. त्या दरम्यान त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केली. त्यांच्या वक्तव्याचा भाऊरावांनी चांगलाच समाचार घेतला. यावर बाळासाहेब खेर यांनी रयतचे अनुदान बंद करून प्रतिसाद दिला. यावेळेस बाळासाहेब खेर यांना महात्मा गांधी यांच्या हत्येत भाऊराव पाटील सामील असल्याचा गैरसमज झाला. वास्तविक महात्मा गांधी यांच्या हत्येननंतर भाऊरावांनी एका सभेत महात्मा गांधी यांच्या नावाने १०१ विद्यालय काढण्याची प्रतिज्ञा केली होती. पण दुर्दैवाने चांगल्या कामाला हजारो विघ्न असतात. रयत शिक्षण कशी बशी तग धरत असताना अचानक त्यांच्या संस्थेचं अनुदान बंद करण्यात आल्याने भाऊराव मोठ्या अडचणीत आले. संस्था बंद करावी लागते कि काय अशी अवस्था आली.
‘पाठीवर मारा पण पोटावर मारू नका’
भाऊरावांना अशा वेळेस गाडगे महाराजांची आठवण झाली. त्यावेळेस नाशिक मध्ये गाडगे महाराजांचं कीर्तन चालू होतं. तिथे जाऊन भाऊराव पाटलांनी त्यांची अडचण सांगितली. गाडगे महाराजांना अनुदान थांबणे म्हणजे गोर गरीब मुलांच्या भविष्याला अंधारात टाकण्यासारखे आहे, हे कळत होतं. सुरवातीपासून गाडगे महाराजांना भाऊरावांच्या कामाबद्दल प्रेम होतं. भाऊरावांच्या काम किती मोलाचं आहे हे गाडगे महाराज सुरवातीपासून बोलत होते. बाळासाहेब खेर पुण्याला असल्याची माहिती गाडगे महाराजांना मिळाली. थेट बाळासाहेब खेर यांच्याकडे गाडगे महाराज गेले. ‘पाठीवर मारा पण पोटावर मारू नका’ या शब्दात खेर यांना बोलले. गाडगे महाराजांनी सांगितल्यावर बाळासाहेब खेर यांचा गैरसमज दूर झाला. बाळासाहेब खेर गाडगे महाराजांना गुरु मानत होते. स्वतः गाडगे महाराज त्यांना सांगायला आले म्हणल्यावर बाळासाहेबांनी लगेच सूचना करून अनुदान पूर्ववत करायला सांगितले.
संक्रातीला मुलांना गोड धोड खाऊ घालण्यासाठी भाऊरावांच्या पत्नीला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागलं होतं. इतका मोठा त्याग भाऊराव आणि त्यांच्या पत्नीला करावा लागला होता. भाऊराव शिक्षणाचं हे ब्रीद पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर अनवाणी फिरले. बहुजनाच्या मुलांना एकत्र शिकवून जातीभेद कमी केला. महात्मा फुलेंचा विचार खऱ्या अर्थाने कर्मवीर भाऊराव पुढे घेऊन आले. या महामानवाचा महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे.