मंगळवेढा (प्रतिनिधी)ः उसाला पहिली उचल 2500 रुपये व अंतिम बिल 3100 रुपये त्वरित जाहीर करावे या मागणीसाठी शनिवारी सकाळी 11.00 वा. मंगळवेढा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर माचणूूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह भिमा नदीकाठच्या सर्व शेतकर्यांनी एकत्र येवून रास्ता रोको आंदोलन केले.दरम्यान रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूला वाहनांची कोंडी झाल्याचे चित्र होते.
ऊस आंदोलनाची व्याप्ती आता जिल्हाभर वाढली असून जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी ऊस दरासाठी विविध ठिकाणी आंदोलने होत असल्याने शेतकरी वर्ग आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर येऊन उसाची वाहतूक रोखणे, टोळ्या बंद करणे, रस्ता रोको आंदोलन करणे अशा प्रकारे वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे व साखर कारखानदाराचे लक्ष वेधून घेतले जात आहे. मागील दोन वर्षे कोरोना असल्यामुळे शेतकर्यांनी कारखाना जे बिल देईल त्याप्रमाणे स्विकारले मात्र आता वाढती महागाई लक्षात घेता शेतकरी वर्ग यंदा आक्रमक झाल्याचे चित्र आहे.परिणामी सर्व शेतकरी वर्गातून एकजुटी निर्माण होवून वाहने अडवली जात आहेत.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अॅॅड राहुल घुले यांनी जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊस दराची मागणी वेळीच मान्य न केल्यास भविष्यातील परिणामाला सामोरे जाण्याची कारखानदारांनी तयारी ठेवावी असा निर्वाणीचा इशारा दिला. युवराज घुले म्हणाले की दि 31 रोजी जिल्हाधिकार्यांच्या बैठकीत साखर सम्राटांनी योग्य भूमिका घ्यावी अन्यथा 1 नोव्हेबर पासून आंदोलन तीव्र करून कारखानदारांना सळो की पळो करून सोडू. तालुक्यातील एकही कारखाना चालू राहणार नाही असा इशारा दिला. शेतकर्यांचा कोणी वाली राहिला नाही असे विकास पुजारी, अनिल बिराजदार यांनी मत मांडले. यावेळी अॅॅड राहुल घुले, जिल्हा संघटक युवराज घुले, शेतकरी संघटनेचे रामभाऊ सारवडे, पोपट पडवळे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, गणेश गावकरे,तानाजी पाटील, शरद कोळी, पांडुरंग बाबर, विश्वास बाबर,राजेंद्र रणे, चंद्रकांत बाबर, मोहन घोडके, भरत शेटे, सूर्यकांत बेदरे, सत्यवान शिंदे, नवनाथ पुजारी, सुनील बिराजदार, संतोष सोनगे, सज्जनबापू पाटील, मधुकर पाटील, विकास पवार, उपसरपंच आण्णासाहेब पाटील, समाधान पाटील, आण्णासाहेब पुजारी, बाळकृष्ण मोरे, रवी पाटील, धनंजय सरवळे, बाबा चव्हाण, नागेश कुंभार, रमेश चव्हाण, शंकर संगशेट्टी आदी उपस्थित होते या आंदोलनात माचणूर, ब्रह्मपुरी, बठाण, उचेठाण, रहाटे वाडी , तांमदर्दी, अरळी, बोराळे, सिद्धापूर, ताडोर , डोणज या गावातील शेतकरी उपस्थित होते
शेतकरी संघटनेच्या मागण्याचे निवेदन मंगळवेढयाचे मंडल अधिकारी धनंजय इंगोले यांना देण्यात आले. अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
आंदोलनादरम्यान एक अॅब्युलन्स मंगळवेढयाकडून सोलापूरकडे रुग्णांना घेवून निघाली होती. माचणूर येथे आंदोलनामुळे रस्ता बंद होता. आंदोलकांनी तत्परता दाखवून या अॅब्युलन्सला जाण्यासाठी तात्काळ मार्ग मोकळा करून दिला.