प्यादं काय पकडताय, म्होरक्याला डांबा -- प्रकाश मुळिक, मंगळवेढा - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

प्यादं काय पकडताय, म्होरक्याला डांबा -- प्रकाश मुळिक, मंगळवेढा


अख्खं जग कोरोनाविरुध्द झुंजतंय. संपुर्ण अमेरिका, युरोप उध्वस्त झालाय. त्या त्या देशातील माणसांना मरणाच्या खाईत न लोटता त्यांना वाचविण्यासाठी शर्थीची झुंज चालू आहे.

आपल्या देशात कोरोनाविरुध्द टाळ्या, थाळ्या, मोंबत्ती  आणि त्यानंतर मन की बात अन आता आता केंद्रीय आरोग्य सचिवांच्या प्रेस कॉन्फरन्स. तरीही देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांनी केंद्रीय सत्तेला संपुर्ण सहकार्य केलंय. अजून तरी या विषयावर राजकारण दिसत नाही.( विरोधी पक्ष नाही पण पीएम केअर फंडाच्या निमीत्तानं मोदी सरकार मात्र राजकारणच करतंय.) देशपातळीवरील माध्यमानीही मध्यममार्गी भुमिका घेतल्याचं दिसतंय. 

             पण महाराष्ट्रात चित्र वेगळंच आहे. केंद्राकडून मदतीची वाट न पाहता ठाकरे सरकारनं महाराष्ट्रात संयमानं सर्व परिस्थीती हाताळली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजकारणात नवखे असूनही त्यांनी शरद पवारांच्या पाठबळावर उत्तम रितीनं प्रशासन हाताळलं आहे त्याला तोड नाही. कोरोना महामारीच्या या संकटाच्या काळात शासनाला, प्रशासनाला सहकार्य करणं, नियमांचं पालन करणं हे राज्यातील प्रत्येकाचं प्रथम कर्तव्य आहे. त्यात जसा सामान्य माणूस आहे तसाच राजकारणी, उद्योगपती, व्यापारी, नोकरदार सुध्दा आहे. स्त्री आहे तसे पुरुषपण आहेत. श्रीमंत आहेत तसे गरीबपण आहेत. नियम, कायदे सर्वाना सारखेच आहेत. संकटकाळात आपल्या वर्तनानं शासनापुढं आणखी अडचणी निर्माण होणार नाहीत याचं भान प्रत्येकानं ठेवायलाच हवं. मग यात माध्यमांची जबाबदारीही तितकीच महत्वाची आहे. या माध्यमात बसलेल्यांना राजकारणाबरोबरच सामाजिक भान आणि उत्तरदायित्व याचीही जाणीव असायला हवी. आणि जर हे भान आणि जान नसेल किंवा असूनही जर मुद्दाम उद्दामपणा केला तर काय होतं त्याचं ताजं उदाहऱण म्हणजे परप्रांतीय कामगारांची आपापल्या गावी जाण्यासाठी परवा मुंबईतील बांद्रा रेल्वे स्टेशनवर झालेली तुफान गर्दी. कामगारांना नेण्यासाठी विशेष रेल्वे ही ब्रेकींग न्युज दाखवण्याचा खोडसाळपणा ABP माझा या मराठी न्युज चॅनलवाल्यानी केला तिथं त्यांचं भान हरवलं होतं की आणखी काही होतं हे कळायला मार्ग नाही. पण कोरोनाविरुध्दच्या या लढ्यात एकदिलानं लढणारा महराष्ट्र काही काळ विचलीत झाला. कारण चॅनलवर दिसणारी गर्दी परगांवी आपल्या गावी जाण्यासाठी होती असं भाजपचेच आशिष शेलार आदी मंडळी खुशीत माध्यमाला सांगत होती तर मग त्याच गर्दीतल्या एकाच्यापण हाती एखादं कपड्याचं गाठोडं, एखादी बॅग अजिबात दिसत नव्हती.
असो तर मुद्दा आहे, राहूल कुलकर्णी या ABP माझा मराठी न्युज चॅनलच्या प्रतिनीधीवर गुन्हा दाखल केला त्याबद्दलचा. संचारबंदीचं उलंघन करायला प्रवृत्त केल्याबद्दल जर गुन्हा दाखल केला असेल तर बेजबाबदार राहूल कुलकर्णी ऐवजी त्या वाहिनीचा जबाबदार संपादक या नात्याने राजीव खांडेकरला पोलीसांनी उचलायला हवं होतं. पण माध्यमांनी आजही खांडेकरला दडवूनच ठेवलंय. उलट ABP माझा वर Support Rahul Kulkarni असं आवाहन केलं जातंय.
लोकसत्ताकारांनीपण राहूल कुलकर्णीला सपोर्ट करताना पध्दतशीरपणे राजीव खांडेकरला दडवलाय. एक अवाक्षरही आपल्या अग्रलेखात((दि. १६ एप्रिल २०) त्याच्याबद्दल लिहीलं नाही मात्र त्याचवेळी राज्यसरकारला स्थलांतरीत कामगारांच्या प्रश्नावरुन बेजबाबदारपणाबद्दल बोल लावलेत. आपल्या एका ब्रेकींग न्युजनं काय होईल याचंही भान जर यांना नसेल तर अशा उंडग्या माध्यामांची किमान महाराष्ट्राला तरी गरजच नाही. बांद्र्याला ही अशी अनैसर्गिक जमवलेली भयानक गर्दी म्हणजे कोरोना साथीच्या रोगाचा भयानक स्फोट होय. त्यात परत महाराष्ट्र भाजपवाल्यांनी तर कमरेचं सोडून डोक्याला केव्हाच गुंडाळलंय. अशा बिकट परिस्थीतीत एक तर शासनाच्या पाठीमागं उभं रहायला हवं जे देशपातळीवर कॉंग्रेसनं केलं तसं किंवा जमत नसेल तर शांत रहावं. पण सत्ता गेल्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा तडफडणवीस झालाय.
हे १०५ वाले कौरव वांद्र्यासारख्या घटनांची वाटच पाहत आहेत, ज्यात त्याना फक्त राजकारणच करायचं आहे.

लेखक : प्रकाश मुळिक, मंगळवेढा 
test banner