“एक दिवस पालकांचीच शाळा” हा प्रायमाचा अनोखा उपक्रम - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

“एक दिवस पालकांचीच शाळा” हा प्रायमाचा अनोखा उपक्रम



मंगळवेढा – प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयाने “एक दिवस पालकांचीच शाळा” हा अनोखा उपक्रम मंगळवार दि.११ रोजी केला. या दिवशी प्रायमामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वच मुलां-मुलींना सुट्टी देऊन त्यादिवशी मुलां-मुलींच्या माता पालक यांचीच विद्यार्थ्याप्रमाणे शाळा भरवली. यास पालकांनी उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिला. या अनोख्या उपक्रमाचे पालकांनी स्वागत आणि कौतुक केले. प्रायमा नेहमीच मुलांच्या सोबत पालकांनाही प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करुन घेते आणि नवनवीन उपक्रम यशस्वी करते म्हणून पालकांना प्रायमाबद्दल आकर्षण होत आहे.

           वर्षभरात विद्यार्थ्यांची शाळा भरतच असते, परंतु प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयामध्ये चक्क पालकांचीच शाळा भरली. एक दिवस माता पालकच शाळेत विद्यार्थी म्हणून येणार होते म्हणून त्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली होती. प्रवेशव्दारात रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर मुलांचा दररोज ज्या पध्दतीने राष्ट्रगीत, वंदे मातरम, प्रतिज्ञा, परिपाठ इत्यादी घेतला जातो अगदी त्याचप्रमाणे माता पालक यांना हे उपक्रम  घेण्यात आले.

यावेळी सरस्वती नमन, प्रार्थना, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान, मंगळवारचे भजन, कराग्रे वसती, हे प्रभु, गणपती स्त्रोत्र, आईची प्रार्थना, संस्कार प्रार्थना, देव जेवला, कवायत प्रकार, शाळेच्या दारात, आनंददायी, चिलमुला चिलमुला, आई बाबा तुम्ही!, हातात माझ्या जादू हे गीत माता पालकांच्याकडून करुन घेतले. आणि त्यांची मुले-मुली हे दररोज म्हणतात म्हणून घरी गेल्यानंतरही हेच म्हणून दाखवितात असे पालकांनी सांगितले.

यावेळी मुलां-मुलींना बाराखडी, चौदाखडीच्या सोबतच एकोणीसखडी शिकविली जात असून एकोणीसखडीचे कृतिशील पध्दतीने सर्वच शिक्षिकांनी माता पालकांना प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. यामुळेच मुलांना अक्षरांची ओळख निर्माण होते. अक्षरांची ओळख किंवा अक्षरांशी मैत्री झाल्याशिवाय मुले अभ्यास करत नसतात म्हणून मुलांच्यामध्ये प्रथम अभ्यासाची आवड निर्माण केली जाते.  एकोणीसखडी शिकविण्यामुळे अंगणवाडी, बालवडीमधील मुले इयत्ता पाचवी ते बारावीच्या मुलांप्रमाणे अक्षरवाचन सहज करु शकतात. फक्त प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयातील मुलांनाच बाराखडी, चौदाखडी सोबत एकोणीसखडीचे देखील प्रशिक्षण देत असल्यामुळे माता पालकांनी समाधान व्यक्त केले.

त्यानंतर प्रत्येक माता पालक आपापल्या मुलांच्या वर्गात म्हणजे शिशु, लहान, मोठा गट या वर्गाप्रमाणे वर्गात जाऊन बसले. त्याचवेळी त्यांनी त्यांची लहानपणीची शाळा, ते वर्ग, शिक्षक आठवण्याचा प्रयत्न केला. ज्या त्या वर्गातील गट शिक्षिकांनी त्यांच्या गटाप्रमाणे अभ्यास घेतला. वर्गातील प्रोजेक्टर, डिजिटल बोर्डवर, टी.व्ही. चालू करुन मुलांना अभ्यासक्रमातील नेमका कोणता भाग यावर शिकविला जातो याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यामुळे माता पालकांच्यामध्ये एक उत्साह दिसून येत होता. आपण आपल्या मुलांना प्रायमामध्ये प्रवेश दिलेल्याचे सार्थक होत आहे असे व्यक्त केले.
           
         'एक दिवस पालकांची शाळा' या उपक्रमात मुलांना दररोज दाखविण्यात येणाऱ्या ई-लर्निंगमध्ये शालेय शिक्षणाबरोबरच समाजातील सामाजिक, मानसिक व शारीरिक शिक्षणाचेही महत्त्व, विविध किल्ले-गड यांची माहिती, इंग्रजी, मराठी भाषेचा अभ्यास, बडबडगीते, इंग्रजी कविता इत्यादी पालकांना दाखविण्यात आले. मुलांमधील असणारे उपजत सुप्त कलागुणांना चेतना देऊन समाजाभिमुख नागरिक निर्माण करता येतील असे मत प्रायमा संस्थेच्या सचिवा वैशाली कुंभार यांनी व्यक्त केले. याशिवाय मुलांना धाकात, दडपणात ठेवून केवळ अभ्यास करवून न घेता खेळण्याला, इतर कलाशिक्षणालाही तितकेच महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले.

           प्रायमाच्या एक दिवस पालकांची शाळा मधील विद्यार्थी म्हणजेच माता पालक यांनी आजच्या घेतलेल्या उपक्रमामुळे खरोखरच मानसिक समाधान मिळाले. आमची मुलं खरोखरीच गुणी आहे. प्रायमा मध्ये मुलांना प्रवेश दिल्यामुळे मुलांचा शैक्षणिक पाया तर मजबूत होणारच आहे. याशिवाय मुलांच्यावर चांगले संस्कार घडविले जातात याचा आम्हांला  सार्थ अभिमान आहे. वर्षभरात प्रायमाने मुला-मुलींच्या सोबत पालकांना देखील एक आगळा वेगळा आनोखा असा आनंद आज दिलेला आहे. हा आनंद आम्ही कधीच विसरु शकत नाही असे मत सर्वच माता पालकांनी व्यक्त केले.

 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रायमाचे अध्यक्ष नीलकंठ कुंभार, संस्थेच्या सचिवा वैशाली कुंभार, संचालिका ईशा पटवर्धन यांच्या मार्गदर्शना खाली प्रशालेच्या शिक्षिका सविता रत्नपारखी, लता कुलकर्णी, सारिका चव्हाण, अश्विनी टाकणे, पूजा ढोणे, सुनिता कुंभार, निता डोके, स्वाती माळी, गीता गुंगे, वैशाली खांडेकर, राधिका भगत, सुजाता मुदगूल, शिला पलंगे, सुजाता चिंचकर, गजानन कसगावडे आणि महत्वाचा दुवा असणारे माता पालक यांनी परिश्रम घेतले.
test banner