महायुतीच्या उमेदवाराला अडचण होऊ नये म्हणून बंडखोरी केली नाही... शैला गोडसे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

महायुतीच्या उमेदवाराला अडचण होऊ नये म्हणून बंडखोरी केली नाही... शैला गोडसे


 मंगळवेढा(प्रतिनिधी )शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली नाही म्हणून जनतेच्या आणि काही शिवसैनिकांच्या आग्रहाखातर अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. हा अर्ज मागे घेताना पक्षविरोधी बंडखोरी करायची नाही आणि महायुतीने  दिलेला उमेदवार निवडून आणायचा ही भूमिका मनात ठरवली होती. दोन वर्षे पक्षाचे निष्ठेने काम करूनही अधिकृत उमेदवारी मिळाली नाही म्हणून सुरुवातीला मला वाईट वाटले म्हणून काही दिवस घराच्या बाहेर हि गेले नाही अशावेळी  ज्यांना महायुतीतून उमेदवारी मिळाली आहे, त्यांनी किंवा त्यांच्या परिवारातील प्रतिनिधीने किमान विचारपूस करावी असे दुःख झालेल्या उमेदवारास वाटणे स्वाभाविक आहे व मलाही तसेच वाटत होते परंतु आजतागायत त्यांच्याकडून साधी विचारपूस सुद्धा झालेली नाही. तसेच स्वतःच्या पक्षातील जिल्हाप्रमुख किंवा तालुकाप्रमुख यांनी सुद्धा संपर्क साधायचे कष्ट घेतले नाही.

उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर महायुतीच्या  उमेदवारांच्या प्रचारार्थ मा. मुख्यमंत्री महोदय यांची मंगळवेढा येथे झालेल्या सभेला तरी किमान मला बोलतील असे वाटले होते परंतु तसे काही झाले नाही त्यानंतर महायुतीच्या उमेदवाराचे गावभेट दौरे सुरू झाले या गावभेट दौऱ्याच्या वेळी प्रचारामध्ये आपण सहभागी होऊन महायुतीच्या  उमेदवारासाठी मत मागण्याची माझी प्रबळ इच्छा होती. परंतु उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीकडून साधी विचारणा सुद्धा होत नसेल तर आपण स्वतःहून कसे जायचे? प्रचारामध्ये माझ्या सहभागाने त्यांना अडचण वाटत असेल तर इच्छाशक्ती असूनही आपण स्वतःहून त्याच्यामध्ये मिसळणे योग्य होणार नाही, असे माझे वैयक्तिक मत होऊ लागले आणि मी त्यांच्या निरोपाची वाट पाहत राहिली

 मा. मुख्यमंत्री महोदय यांची सभा झाल्यानंतर गावागावातील शिवसैनिकांचे आणि कामाच्या निमित्ताने जोडलेल्या कार्यकर्त्यांचे फोन येऊ लागले की, शैलाताई तुमची भूमिका काय आहे? आणि आम्ही काय करावे ते सांगा. एका बाजूला महायुतीच्या  उमेदवाराचा प्रचार करायची माझी स्वतःची प्रबळ इच्छा असताना महायुतील  नेते मंडळी कडून साधी विचारपूस सुद्धा होत नव्हती तर दुसऱ्या बाजूला जनतेकडून आणि शिवसैनिकांकडून सातत्याने विचारणा होऊ लागल्याने नाईलाजास्तव काही दिवस मला माझा मोबाईल फोन बंद ठेवावा लागला.
उमेदवारी न  मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरण्यासाठी आणि ज्या कार्यकर्त्यांनी आपणास मदत केली होती, त्यांना भेटण्यासाठी मी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावातील त्या गावच्या ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन सलग पाच दिवस शिवसैनिका बरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला .माझा मोबाईल फोन जरी बंद असला तरी मी मतदारसंघांमध्ये नियोजित कार्यक्रमाप्रमाणे दौरा करीत होते यादरम्यान सुद्धा महायुतीचे नेते मंडळीकडून प्रचार कार्यात सहभागी होण्यासाठी विचारपूस झाली नाही त्यानंतर मात्र मला खात्री पटली की प्रचार कार्यामध्ये माझ्या सहभागाची महायुतीला  आवश्यकता राहिली नाही

"महायुतीच्या उमेदवार निवडून यावा म्हणून पक्षप्रमुखांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मी बंडखोरी केली नाही. मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही किंवा माझ्यावर अन्याय झाला आहे असेही नाही तसेच माझ्यावर कोणी अन्याय केला आहे असेही शिवसैनिक व जनतेने समज करून घेऊ नये कारण राजकारणात अशा घडामोडी घडत असतात हे समजून घेणे महत्वाचे आहे त्यामुळे शिवसैनिकांनी आणि जनतेने नाराज न होता महायुतीच्या उमेदवारा मागे आपली ताकद उभी करावी आणि प्रचंड बहुमताने विजयी करावे असे नम्र आवाहन मी शैला गोडसे शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख या नात्याने करीत आहे."
test banner