पंढरपूर परीक्षा केंद्रातून ज्येष्ठ विद्यार्थी सुधाकरपंत परिचारक उत्तीर्ण होणार की पैलवान विद्यार्थी उत्तीर्ण होणार ! मंगळवेढा(प्रतिनिधी )विधानसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचा अभ्यास करण्याचा कालावधी संपला आहे. रविवारी प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी त्यांच्याकडून जोमाने सुरू असून सोमवारी त्यांची अंतिम परीक्षा होणार आहे. परीक्षेत यश मिळावे यासाठी काही परीक्षार्थी शनिवारी रात्रीपासूनच परीक्षा केंद्राच्या परिसरात कॉपी करुन उत्तीर्ण होण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले.
सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांत आमदारकीच्या परीक्षेसाठी मतदान घेण्यात येत आहे. या परीक्षेत कोण उत्तीर्ण होणार याकडे सर्व मतदारांच्या नजरा लागल्या आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच उमेदवारांनी परीक्षेचा अभ्यास थांबविला असून रविवारी परीक्षेसाठी आवश्यक असणार्या प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येणार आहे.
पंढरपूर परीक्षा केंद्रातून ज्येष्ठ विद्यार्थी सुधाकरपंत परिचारक उत्तीर्ण होणार की पैलवान विद्यार्थी उत्तीर्ण होणार, तर एक सिव्हिल इंजिनियर तर निवृत प्राध्यापक हे भविष्यात आमदार होण्यासाठी परीक्षाला बसले असून याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्यामुळे याकडेही सर्व मतदारांच्या नजरा लागल्या आहेत. गुरूवारी दुपारपर्यंत अंतिम परीक्षेचा निकालसमोर येणार आहे.
परीक्षेत यश मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ राजकीय मार्गदर्शकांचे शिबिर घेतले.माजी केंंद्रीय मंत्री शरद पवार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,वंचित बहुजन समाजाचे अॕड.बाळासाहेब आंबेडकर,खा.अमोल कोल्हे,रणजीतसिंह मोहिते-पाटील,धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, आदी तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन परीक्षार्थ्यांना लाभले आहे. त्यामुळे कोणत्या मार्गदर्शकाचा विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सोमवारी परीक्षा केंद्रात घेतल्या जाणार्या परीक्षेत यश मिळावे यासाठी रविवारी काही परीक्षार्थी कॉपी करतानाही दिसून आले. परीक्षा केंद्राच्या परिसरात शनिवारी रात्रीपासूनच कॉपी पुरविण्याचाही प्रकार होत असल्याची चर्चा होत होती.