अस्थिविसर्जन करुन वृक्षलागवडीचा राज्यापुढे आदर्श - ह.भ.प. शिवाजी मोरे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

अस्थिविसर्जन करुन वृक्षलागवडीचा राज्यापुढे आदर्श - ह.भ.प. शिवाजी मोरेमंगळवेढा(प्रतिनिधी) कृषीमाता कै.अनुसया पडवळे यांच्या अस्थिविसर्जन करुन त्यावर १०१ फळझाडे लावून त्यांची कायम स्वरुपी आठवण व सावली ठेवण्यासाठी कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्या कुटुंबाने घेतलेला हा पर्यावरणपुरक उपक्रम राज्या पुढे आदर्श निर्माण करेल असे मत विठ्ठल-मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजी मोरे महाराज यांनी व्यक्त केले.
  खुपसंगी(ता.मंगळवेढा) येथे कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी आपल्या आई कृषीमाता कै.अनुसया पडवळे यांचे दि,९//१०/२०१९ रोजी दुःखद निधन झाल्यानंतर त्या अस्थि नदीमध्ये विसर्जित न करता झाडांच्या खड्ड्यात विसर्जित करुन त्यावर १०१ फळझाडे लावण्याच्या काल दि. १६ च्या कार्यक्रमात ह.भ.प. मोरे महाराज बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर राज्य महिला आयोगाच्या सदस्या चंद्रिका चौहान, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना शर्मा, विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने, जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचला पाटिल, कृषिभूषण अंकुश पडवळे, तावशीच्या सरपंच सोनाली यादव, वृक्षमित्र दत्ता बागल उपस्थित होते.
   पुढे बोलताना ह.भ.प. मोरे महाराज म्हणाले की, आपल्या संस्कृती मध्येच पूर्वी पासून गोमुत्र, शेणसडा व झाडे लावणेबाबत सांगितले आहे.पण आधुनिक जगात पर्यावरपुरक गोष्टी आपण विसरत जात आहोत. पण पडवळे कुटुंबाने कृषीमाता कै.अनुसया पडवळे यांच्या अस्थि झाडांच्या खड्ड्यात विसर्जित करुन त्यावर १०१ फळझाडे १०१ सुहासिनी महिलांच्या हस्ते लागवड करुन आपल्या कुटुंबातील स्वर्गवासी झालेल्या व्यक्तीच्या आठवणी झाडाच्या रुपाने चिरंतन ठेवल्या आहेत. पडवळे कुटुंबाचा सदर उपक्रम हा राज्यापूढे आदर्शवत असा आहे. समाजाने या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर अनुकरण करुन पर्यावरणपुरक काम करणे अत्यंत गरजेचे आहे. झाडे आपणाला सावली, फळे, अॉक्सीजन व पाऊस देतात. त्याबदल्यात ते काहीच मागत नाहीत त्यामुळे समाजाने आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आठवणीसाठी पडवळे कुटुंबाच्या उपक्रमाचे अनुकरण करण्याचे अहवान ही ह.भ.प.मोरे महाराज यांनी केले.
      यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्या चंद्रिका चौहान बोलताना म्हणाल्या की, आज समाज अधोगतीकडे चालला आहे. सुशिक्षित लोकांच्या घरचेच जास्त आई वडील अनाथ व वृध्दाश्रमात आहेत.अनेकांना आपल्या आई वडिलांचे ओझे वाटते आशा काळात पडवळे कुटुंबाने कृषीमाता कै.अनुसयांच्या आठवणी कायमस्वरुपी रहावी यासाठी पर्यावरणपुरक झाडे लावण्याचा उपक्रम हा अतिशय स्तुत्य व बिघडत असलेल्या समाजाला दिशा देणारा असल्याचे सांगितले.
      राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालिका ज्योत्स्ना शर्मा बोलताना म्हणाल्या की, कै. अनुसया यांनी शेती मध्ये आयुष्यभर केलेले काम व महिलांनी शेती करुन कुटुंबाला हातभार लावावा यासाठी त्यांचा आग्रह होता. आशा कृषीमातेच्या आठवणी फळझाडांच्या रुपाने कायम चिरंतन राहतील.
      विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने म्हणाल्या की, आपल्या जवळच्या स्वर्गवाशी झालेल्या लोकांच्या आठवणीसाठी १०१ फळझाडे अस्थिविसर्जन दिशादर्शक आहे. कै.अनुसया या वारकरी सांप्रदायाच्या होत्या व त्यांना आलेले मरण हि बुधवारच्या एकादशी दिवशी येणे हा चांगला योग असल्याचे सांगितले.
        जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचला पाटिल बोलताना म्हणाल्या की, कृषी क्षेत्रातही महिला आदर्शवत काम करित आहेत.कै.अनुसया यांनी प्रत्यक्ष शेतात केलेले कष्ट व कुटुंबाला प्रतिकुल परिस्थितीत दिलेला आधार यामुळेच पडवळे कुटुंबाला त्यांची कायमस्वरुपी आशिर्वाद रहावेत यासाठी त्यांनी १०१ फळझाडे लावून केलेले काम दिशाहिन समाजाला दिशा देईल.
     कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी आई कै.अनुसयाच्या आठवणी सांगून. आईची सावली कुटुंबावर कायमस्वरुपी रहावी याच साठी वृक्षलागवडीचा निर्णय आमच्या कुटुंबाने घेल्याचे सांगितले.
     कार्यक्रमास सुभाष डोंगरे, हरिभाऊ यादव, अतुल पाटिल, बापूसाहेब यादव, बापूसाहेब मेटकरी आदिसह पडवळे कुटुंबाचे नातेवाईक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय दवले यांनी केले.

क्षणचित्रे-
१. कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या सदस्या चंद्रिका चौहान यांनी समाजाच्या वास्तव परिस्थितीवर भाष्य केले त्यावेळी अनेक महिला व पुरुषांनाही अश्रू अनावर झाले.
२. अतिशय दुःखद प्रसंगातही पडवळे कुटुंबांने प्रवाहाच्या विरुध्द जाऊन अस्थि विसर्जन पर्यावरणपुरक कार्यक्रमाने केल्याने सर्वांनीच कौतुक केले.
३. कार्यक्रमास अधिकारी महिलासह सर्वच स्थरातील महिलांची उपस्थिती मोठी होती.
४. उपस्थित सर्व महिलांची ओठी चुडा व चोळीने भरण्यात आली.
५. सर्वांच समाजाने पडवळे कुटुंबाच्या वृक्षलागवड उपक्रमाचे अनुकरण केलेच पाहिजे असे सांगितले.

फोटो ओळी - कृषीमाता कै.अनुसया पडवळे यांच्या अस्थिविसर्जन करुन वृक्षलागवड करताना ह.भ.प शिवाजी मोरे महाराज, चंद्रिका चौहान, डॉ.ज्योत्स्ना शर्मा, सुवर्णा माने,चंचला पाटिल, कृषिभूषण अंकुश पडवळे व उपस्थित महिला.
test banner