ब्रह्मपुरी येथील महाराणी येसूबाई यांच्या नियोजित स्मारकाचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांना प्रा. शिवाजीराव काळुंगे निवेदन सादर - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

ब्रह्मपुरी येथील महाराणी येसूबाई यांच्या नियोजित स्मारकाचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांना प्रा. शिवाजीराव काळुंगे निवेदन सादर


मंगळवेढा (प्रतिनिधी) ब्रम्हपुरी येथे महाराणी येसूबाई यांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी मार्गदर्शन करून सहकार्य करावे, तसेच या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आवर्जून उपस्थित रहावे, अशा आशयाचे माहितीपर निवेदन खा. डॉ. अमोल कोल्हे यांना छत्रपती संभाजीराजे व महाराणी येसूबाई स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त खा. डॉ. अमोल कोल्हे हे पंढरपूर येथे आले असता यावेळी हे निवेदन त्यांना सादर करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, शिवव्याख्याते अमोल मिटकरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मंगळवेढा पासून १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ब्रम्हपुरी येथे १६८५ ते १६८९ या कालावधीत मोघलांची छावणी होती. या छावणीमध्ये महाराणी येसूबाई याच काळात कैदेत होत्या . छत्रपती शाहू राजेही त्यांच्यासमवेत होते . याच काळात छत्रपती शाहूंचे लग्न इथे लागले . हिंदवी स्वराज्याच्या महाराणी येसूबाई यांच्या वास्तव्याने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले हे वारसास्थळ आहे . त्यांच्या स्मृती अजरामर राहाव्यात यासाठीच इथे भव्य स्मारक उभारले जात आहे . महाराणी येसूबाई , छत्रपती शाहू राजे यांच्या स्मृतीसह अनेक मराठा सरदारांच्या समाधी इथे आहेत. जगदेवराव जाधवांचीही मोठी समाधी इतिहास सांगत उभी आहे.
अशा ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले या वारसास्थळी
महाराणी येसूबाई यांचे दोन एकरावर भव्य स्मारक उभे करण्याचा संकल्प धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी केलेला आहे . यामध्ये महाराणी येसूबाई यांचे ऐतिहासिक संदर्भ व माहिती संकलन करणे , चित्र , शिल्प यांच्या माध्यमातून इतिहासाचे दर्शन घडवून आणणे. एकूणच या स्मारकाच्या रूपाने महाराणी येसूबाईचा ऐतिहासिक जाज्ज्वलतेचे दर्शन येणाऱ्या पिढयांना होणार आहे. त्याकामी पुण्याच्या इतिहास अभ्यासक सरोजिनी चव्हाण या माहिती संकलनाचे कार्य करीत आहेत. माचणूर, ब्रम्हपुरी व मंगळवेढा येथील नागरिक व विविध संस्था सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहेत. त्यासाठी या सर्व लोकांना सोबत घेऊन छत्रपती संभाजीराजे व महाराणी येसूबाई स्मारक ट्रस्ट माचणूर - ब्रह्मपुरी या नावे संस्थेची स्थापना केलेली आहे . या संस्थेची रीतसर नोंदणी झाली असून या कामी हे स्मारक आणखी चांगले कसे होईल, मराठी माणसांपर्यंत कसे पोहचेल व सर्व दृष्टीने परिपूर्ण कसे होईल. यासाठी आपल्या मार्गदर्शनाची व सहकार्याची गरज आहे. आपण आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून शक्य तितके सर्व पातळीवरून सहकार्य करावे. व या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आवर्जून उपस्थित रहावे, अशा आशयाचे माहितीपर निवेदन छत्रपती संभाजीराजे व महाराणी येसूबाई स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी खा. डॉ. अमोल कोल्हे यांना दिलेले निवेदनात म्हटले आहे.
test banner