कार्तिकी वारीत वारी परिवारचा व्यसनमुक्तीचा जागर. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२६

कार्तिकी वारीत वारी परिवारचा व्यसनमुक्तीचा जागर.


मंगळवेढा : भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा संगम असलेल्या कार्तिकी वारीच्या निमित्ताने ‘वारी परिवार मंगळवेढा’च्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले. 


वारीला येणाऱ्या भाविकांसह नागरिकांमध्ये व्यसनांचे दुष्परिणाम आणि निर्व्यसनी जीवनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मंगळवेढा आणि पंढरपूर येथे जनजागृतीपर पत्रकांचे वाटप करण्यात आले.


‘कार्तिकी वारीला जाऊया, व्यसनमुक्तीचा संकल्प करूया!’ या संदेशातून भाविकांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन करण्यात आले. 


दारू, गुटखा, तंबाखू यांसारख्या व्यसनांमुळे व्यक्तीचे आरोग्य, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक सुख आणि मुलांचे भविष्य कसे उद्ध्वस्त होते, याबाबत विविध घोषवाक्ये आणि आकर्षक पोस्टरच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.


या अभियानात ‘व्यसनाला द्या नकार, आनंदी जीवनाचा करा स्वीकार!’, ‘दारू ढोसाल, फोटो दिसाल!’, ‘खाल गुटखा तर येईल झटका!’ अशा लक्षवेधी घोषवाक्यांचा समावेश होता.


विशेषतः, ‘दारू पिणारा दारूच पीत नाही, तो स्वतःचं आयुष्य, कुटुंबाचं सुख आणि मुलांचं भविष्य पीत असतो!’ हा संदेश भाविकांच्या मनाला भिडणारा ठरला. तसेच, ‘फालतू व्यसन करायला हिम्मत लागत नाही, हिम्मत लागते आयुष्यभर निर्व्यसनी राहायला!’ या प्रभावी विचारातून व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.


वारी म्हणजे केवळ देवदर्शन नव्हे, तर विचारांची शुद्धता, चांगले संस्कार आणि समाजप्रबोधनाची संधी आहे. संतांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत प्रत्येकाने स्वतः व्यसनमुक्त राहून कुटुंब आणि समाजालाही व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.


भक्तीच्या वाटेवर चालताना व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करूया आणि निरोगी, आनंदी व संस्कारक्षम समाज घडवूया, असा संदेश ‘वारी परिवार मंगळवेढा’च्या वतीने देण्यात आला.


तसेच वारी परिवाराच्या वतीने मंगळवेढा कन्याकुमारी व्यसनमुक्ती जनजागृती सायकल मोहीम सुरू आहे याचे संपूर्ण भारतातून कौतुक होत आहे. 


यावेळी वारी परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते.

test banner