मंगळवेढा-कन्याकुमारी सायकल यात्रेच्या टी-शर्टचे अनावरण. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२६

मंगळवेढा-कन्याकुमारी सायकल यात्रेच्या टी-शर्टचे अनावरण.


मंगळवेढा:-

वारी परिवार सायकल क्लब, मंगळवेढा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मंगळवेढा ते कन्याकुमारी व्यसनमुक्ती जनजागृती सायकल यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष टी-शर्टचे अनावरण हभप बाळकृष्ण महाराज लाड व हभप संदेश महाराज भोसले यांच्या हस्ते तर शशिकांत चव्हाण,प्रा.येताळा भगत,शिलाताई सावंजी,अविनाश चेळेकर,कैलास नरळे,अभिजित देवकर,आझम दारुवाले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.


सायकल यात्रेतून व्यसनमुक्तीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प सायकल क्लबच्या सदस्यांनी केला असुन ओढ… कन्याकुमारी सायकल यात्रेची, एक पाऊल व्यसनमुक्तीकडे’ हे ब्रीदवाक्य घेऊन ही सायकल यात्रा १२ नोव्हेंबर २०२६ रोजी मंगळवेढा येथून प्रस्थान करणार आहे.


महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांतून सुमारे १,३५० किलोमीटरचा सायकल प्रवास करून व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करण्यात येणार आहे.


आजच्या काळात विशेषतः तरुणाईमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देणे आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे हा या यात्रेमागील प्रमुख उद्देश असुन सायकल हे केवळ प्रवासाचे साधन नसून आरोग्य संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचे प्रभावी माध्यम असल्याचा संदेशही या उपक्रमातून दिला जाणार आहे.


या यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष टी-शर्टमुळे सायकलपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार वारी परिवार सायकल क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केला.


मी व्यसन करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही हा विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी ही सायकल यात्रा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


यावेळी शरद हेंबाडे,विठ्ठल बिले,प्रा.महेश आलिगावे,डॉ.राहुल शेजाळ,सागर लंगोटे,प्रफुल्ल सोमदळे,राहुल सावंजी,दत्तात्रय जाधव,फारुख मुजावर आदी सायकल रायडर्स उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले यावेळी वारी परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते.

test banner