मंगळवेढा:-
शिवजयंती नाचून नाही तर वाचुन साजरी व्हावी या विचारातुन राहुल ताड यांच्या मार्गदर्शनाखाली व रवि मोरे यांच्या संकल्पनेतून मंगळवेढा येथील नगरपालिका शाळा नंबर दोन या शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ग्रंथदिंडी काढण्यात आली.
या ग्रंथदिंडी मध्ये शिवाजी महाराजांच्या पत्रातुन कळणारे शिवाजी महाराज,शिवचरित्राची शिकवण,शिवराय शिक्षण आणि संस्कार,शिवचरित्रातील शंभुराजे या पुस्तकांचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन करून ग्रंथदिंडी काढण्यात आली.
या ग्रंथदिंडी मध्ये नगरपालिका शाळा नंबर दोन मधील शिक्षक मुख्याध्यापक मांजरेकर गुरूजी,जाधव गुरूजी,राऊत गुरूजी, राक्षे गुरूजी,काझी मॅडम,लाळे गुरूजी उपस्थित होते.
नगरपालिका शाळा नंबर दोन इथुन ग्रंथदिंडी जुनी बॅंक ऑफ इंडिया मुरलीधर चौक, चोखामेळा चौक अशी काढण्यात आली.या फेरी मध्ये विद्यार्थ्यांनी शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा,शिवचरित्र वाचुन आत्मसात करा,झाडे लावा झाडे जगवा,शिवजयंती घरोघरी साजरी करा अशा घोषणा दिल्या.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मंगळवेढा येथील शिवमुर्तीचे पुजन करून शिवमुर्ती समोर विद्यार्थ्यांनी शिवचरित्राचे वाचन केले व वाचन संस्कृती जोपासण्यासाठी नवा पांयडा पडला.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
यावेळी राहुल ताड, माजी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे,रवि मोरे,प्रशांत मोरे,सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे,हर्षवर्धन डोरले,सतिश दत्तु,मुळीक साहेब,राहुल सांवजी,सुदर्शन ढगे उपस्थित होते.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी खिलाडी ग्रुप मंगळवेढा यांनी परिश्रम घेतले.