राजमाता जिजामाता राष्ट्रीय प्रेरणेचा स्त्रोत!
छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य इतिहासातील आदर्श राज्य मानलं जातं. हे आदर्श स्वराज्य ज्यांच्या संस्कारातून उभं राहिलं त्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे (१२ जानेवारी).
ज्या शूर स्त्री - पुरूषांनी आपल्या देशाचे नाव इतिहासात अजरामर केले अथवा ज्यांनी आपल्या कर्तबगारीने अनेक यशस्वी रण गाजवले ,त्यांच्या कृृत्याचे कितीही स्मरण केले तरी त्यांच्या ऋणातून सर्वस्वी मुक्त होणे कठिण आहे. राष्ट्रमाता ,राजमाता जिजामाता यांचा जन्मोत्सव साजरा करण्यामागे हीच कृतज्ञतेची भावना आहे. राष्ट्रातील या महान राजमाता लोकमाता आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राखण्यास चांगले साधन आहे.
राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि प्रतापशाली छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजी होत्या. ह्या दोन राजांना घडविण्यात या माऊलीचा सर्वात मोठा हात.
त्यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ ला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे लखुजी जाधव यांच्या घरी झाला.
जिजाऊंचा विवाह मालोजी राजे भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे डिसेंबर १६०५ साली मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मालोजींना निजामशहाकडून पाचहजारी मनसब, शिवनेरी व चाकण हे किल्ले आणि पुणे व सुपे हे दोन परगणे जहांगीर म्हणून मिळाले. शहाजीराजांनी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यात सुरक्षित ठेवले.
येथेच १९ फेब्रुवारी १६३० साली जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. जिजाऊंचे पती शहाजीराजे फार पराक्रमी सेनानी होते. त्यांनी पुण्याजवळील अहमदनगर व विजापूर प्रदेश काबीज करून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले.
पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या.
शिवाजी महाराजांना आग्रा येथे जेव्हा कैद झाली होती, त्यावेळी उतारवयात देखील जिजाऊंनी राज्याची जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली. आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांनी महाराजांकरवी पुर्ण करून घेतली आणि त्याकरता त्यांनी तसे संस्काराचे बीज महाराजांमधे पेरले. महाराजा देखील आईच्या सर्व आदेशांना जागले आणि म्हणुन हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात अवतरले.
शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतच १७ जून १६७४ मध्ये त्यांनी देह ठेवला.
रायगडाच्या पायथ्याशी पाचड गावी शेवटचा श्वास घेतला. जणु छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक होण्याचीच त्यांना प्रतिक्षा होती.
अशा जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. जिजाऊं सारखी माता सर्वांना लाभोत.
महाराजांवरचे मायेचे छत्र हरवले. मराठा साम्राज्याचा प्रवर्तक पालनकर्ता आईविना पोरका झाला.
अश्या या जिजाऊंच्या कार्याला आणि त्यांच्या त्यागांना मानाचा मुजरा...