महात्मा - फुले आधुनिक भारताचे पहिले समाजक्रांतिकारक ! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

महात्मा - फुले आधुनिक भारताचे पहिले समाजक्रांतिकारक !१९ व्या शतकाचा शेवटचा कालखंड; धर्मसुधारणा, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींचा काळ ! या काळात काहीशा वेगाने सामाजिक बदलांची प्रक्रिया घडत होती. या चळवळींचे नेतृत्व सखोल चिंतन करणार्‍या, समाजहित जपणार्‍या व धडक कृतीशील असणार्‍या महात्मा फुले यांच्याकडे होते.  शिक्षण व समता या दोन शब्दांत त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांमध्ये केलेल्या सामाजिक कार्याची मूळ प्रेरणा स्पष्ट होते.

महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म १८२७ साली झाला. त्या वेळी संपूर्ण भारतात बहुजन समाज अंध:कारात चाचपडत होता. अज्ञान, अंधश्रद्धा व अस्पृश्यता यांचे भयंकर चटके सोसत होता. स्त्री आणि (तत्कालीन) अस्पृश्य समाज हे या समाजव्यवस्थेतील सर्वाधिक उपेक्षित घटक होते. त्यामुळेच स्त्रीशिक्षण व अस्पृश्योद्धार हे त्यांचे जणू जीवितकार्यच झाले. त्या वेळच्या स्त्रिया ह्या शिक्षण नसल्यामुळे स्वत:ची मूळ अस्मिताच हरवून बसल्या होत्या. या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता होती. मुळात समाजोद्धारासाठी शिक्षण हेच प्रमुख अस्त्र आहे हे ज्योतिरावांनी ओळखले. एक स्त्री सुशिक्षित म्हणजे पुढच्या सर्व पिढ्या सुशिक्षित हे समीकरण त्यांनी जाणले व या पवित्र कार्याची सुरुवात आपल्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी केली. १८४८ साली हिंदुस्थानातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे त्यांनी सुरू केली. त्यांनी व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, लोकविरोधाला उत्तर देत १८५१ ,१८५२ साली व पुढील काळात अनेक कन्या शाळा सुरू केल्या.

स्त्रियांना सबला बनविण्यासाठी, स्त्रीउद्धारासाठी त्यांनी बालविवाह, कुमारीविवाह, विधवांचे केशवपन या परंपरांना प्रचंड विरोध केला. या परंपरांच्या विरोधात जाऊन त्यांनी १८६४ साली पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला. ही एक क्रांतिकारक अशी घटना होती. त्याचबरोबर त्यांनी केशवपनाच्या विरोधी आंदोलन करून नाभिकांचा अभिनव असा संप घडवून आणला. पण तरीही पुनर्विवाह समाजाला पचणे अवघड होते. एखाद्या विधवेला दुर्दैवी परिस्थितीत संतती झाल्यास त्या विधवेस भ्रूणहत्या किंवा आत्महत्येशिवाय पर्याय राहत नसे. ही समस्या ओळखून त्यांनी १८६३ साली पुण्यात पहिले बालहत्या प्रतिबंधक गृहउघडले. त्यांनी याच प्रतिबंधक गृहातील एक मुलगा दत्तक घेतला. यावरूनच त्यांचे स्त्रीविषयक विचार किती आधुनिक व पुरोगामी होते हे स्पष्ट होते. आजच्या समाजाचे स्त्रीविषयक विचार, दृष्टीकोन पाहता त्यांचे द्रष्टेपण लक्षात येते.

स्त्री उद्धाराबरोबरच अस्पृश्योद्धार व अस्पृश्यता निर्मूलन हा त्यांचा ध्यास होता. त्या वेळीचा अस्पृश्य समाज हा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक हक्कांपासून वंचित होता. त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या प्राथमिक मानवी हक्कांच्या प्राप्तीसाठी ते सामाजिक समता चळवळीचे आद्य प्रवर्तक बनले. १८५२ साली त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढली. अस्पृश्यांसाठी त्यांनी पाण्याचा हौद खुला केला. गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब या ग्रंथांतून त्यांनी जातिव्यवस्थेवर प्रहार केला. अस्पृश्य समाजामध्ये आमिविश्र्वास निर्माण होण्यासाठी, समस्यांची जाणीव निर्माण होऊन विकासाकडे वाटचाल होण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची इ.स. १८७३ मध्ये पुणे येथे स्थापना केली. या संस्थेच्या स्थापनेतून त्यांनी बहुजन समाजाच्या विकासाचे बीज रोवले.

सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून काही तत्त्वांचा प्रसार त्यांनी केला. ‘ईश्र्वर एकच व निर्गुण-निराकार आहे. ईश्र्वराच्या भक्तीसाठी कोणालाही कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. धार्मिक कर्मकांडावर विश्र्वास ठेवू नका.’ हे विचार बहुजनांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी `ईश्वर' नव्हे, तर `निर्मिक' असाच शब्द नेहमी वापरला.  राजर्षी शाहू महाराजांना प्रेरणा मिळाली ती महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांतूनच ! महात्मा फुलेंना गुरू मानत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन विकासाची चळवळ पुढे नेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व कार्यावर महात्मा फुले यांचाच प्रभाव होता.


भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि तरीही येथील शेतकरी अज्ञानी, कर्जबाजारी, दरिद्री, मागासलेला असा होता (आहे). यामुळेच या समस्या लक्षात घेऊन शेतकर्‍यांची बाजू मांडण्यास आणि त्यांचे संघटन करण्यास महात्मा फुले यांनी सुरुवात केली. शेतकरी, शेतमजूर यांच्या हालाखीच्या परिस्थितीचे त्यांनी ’शेतकर्‍यांचा आसूड’ या ग्रंथात वर्णन केले आणि या ठिकाणी शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही भूमिका परखडपणे मांडली. तसेच शेतकर्‍यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण मिळावे, वार्षिक कृषी प्रदर्शन भरवले जावे, पाणीपुरवठ्यासाठी तलाव-विहिरी-धरणे बांधावीत, पीकसंरक्षणासाठी बंदुक परवाने मिळावेत या मागण्यांचा पाठपुरावा केला. १८८८ साली त्यांनी ड्यूक ऑफ कॅनॉटसमोर भारतीय शेतकर्‍यांच्या वेषात शेतकर्‍यांचे प्रतिनिधित्व केले. शेतकर्‍यांच्या समस्या व त्या अनुषंगाने त्यावरील पर्यायी योजनांची बाजू मांडली.

महात्मा फुले यांनी असंघटित कामगारांच्या समस्यांचाही विचार केला होता. कामगार संघटक नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ मध्ये मुंबईत गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली. लोखंडे यांनी महात्मा फुले यांच्या प्रेरणेतून ही संघटना स्थापन केली होती. हीच भारतातील पहिली कामगार संघटना मानली जाते. महात्मा फुले काही काळ पुणे नगरपालिकेचे सदस्यही होते.त्यांच्या चळवळीचे केंद्र पुणे हेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचा जिर्णोद्धार महात्मा फुले यांनी केल्याचा उल्लेख त्यांच्याविषयीच्या लेखनात सापडतो.

महात्मा फुले हे उत्कृष्ट लेखकही होते. त्यांनी आपल्या लेखनातूनही सुधारणाविषयक विचारच समाजासमोर ठेवले. त्यांनी तृतीय रत्न (नाटक), छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म (ग्रंथ) या लेखनाबरोबरच ’अखंड’ (काव्य) रचनाही केली. (महात्मा फुले यांनी लिहिलेल्या अन्य पुस्तकांचा उल्लेख वरील मजकुरात आला आहे.)

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।

नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

या रचनेतून त्यांची निरीक्षणशक्ती, नेमकी जाणीव व प्रतिभा स्पष्ट होते.

पिढीजात चालत आलेल्या अमानवी अशा धार्मिक रूढी व परंपरा बंद झाल्याशिवाय समाजामध्ये परिवर्तन होणार नाही हे त्यांनी ओळखले होते. सामाजिक सुधारणांसाठी व्यापक योगदान देऊन, आपल्या मानवतावादी भूमिकेतून वंचित आणि उपेक्षित घटकांना मुख्य समाजप्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महात्मा फुले यांनी केले. आजच्या आधुनिक भारतातील समाजात झालेल्या सामाजिक सुधारणांचे मूळ हे महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्यातच आहे.

`निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’

हा त्यांचा सत्यधर्माचा व मानवताधर्माचा संदेश आजही अनुकरणीय ठरतो.

संकलन:-अजय आदाटे,मंगळवेढा.

test banner