मंगळवेढा: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय अतिशय गंभीर बनत चाललेला आहे. तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती चिंताजनक बनली असताना शासन यावरती कोणताही ठोस निर्णय घेत नाही.यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवेढा तहसील कार्यालयतील शासकिय अधिकाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी आटकाव करून आंदोलन करण्यात आले.
सध्यस्थितीत आरक्षणाचा प्रश्न खूपच चिघळत चाललेला आहे तरी शासन मराठा समाजाचा अंत पाहत आहे अनेक मराठा बांधव आत्महत्या करीत आहेत. अजुन हे निर्दयी सरकार किती जणांचा बळी घेणार आहे. याचा जाब विचारण्यासाठी तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला जाग करण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले.परवाच आमदार समाधान आवताडे यांनी त्वरीत मुंबईला जाऊन मतदार संघातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या लढ्याची परिस्थिती शासन दरबारी मांडावी यासाठी समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सध्या तालुक्यातील बहुतांश गावात मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन दिवसभरासाठी तहसील कार्यालयतील दैनंदिन कामकाज बंद ठेवण्यात आले. तसेच दप्तरी नोंद असलेले कुणबी मराठा पुरावा कागदपत्रांची शोध मोहीम त्वरीत हाती घ्यावी अशी मागणीही समाजाच्या वतीने करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे मराठा बांधव उपस्थित होते.