मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत असताना दोन्ही पक्षाच्या उमेदवारांसमोर एक मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपला उमेदवार देऊन राष्ट्रवादीसमोर आव्हान उभं केलंय. तर दुसरीकडे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या चुलत भावानेही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंढरपूरच्या रिंगणात भाजपनं समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना मैदानात उतरवलं आहे. तर अन्य उमेदवार मिळून तब्बल 39 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अशा स्थितीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना बंडाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या उमेदवारीला घरातूनच विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय. समाधान आवताडे यांचे चुलत भाऊ सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पंढरपूरच्या भाजप पुरस्कृत नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनीही भाजप विरोधात दंड थोपटले आहेत. भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या दोन उमेदवारांमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे नेते हे पक्षांतर्गत बंड कसं थंड करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालकेंच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं. स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांच्या उमेदवारी अर्जासोबत आज स्वाभिमानी पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याद्वारे महाविकास आघाडीच्या विरोधात रणशिंग फुंकलं असल्याचं बोललं जात आहे. माजी खासदार राजू शेट्टी स्वाभिमानीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंढरपुरात तळ ठोकून राहणार आहेत. ते गावोगावी जाऊन प्रचार सभाही घेणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.