पुढच्या १५ दिवसात देशाचं चित्र स्पष्ट होईल
पुढच्या १५ दिवसात देशाचं चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे असं मी सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितलं.
सध्या महाराष्ट्रात ५० हजार उद्योग सुरु झाले आहेत. सहा लाख कामगार हे कामावर रुजू झाले आहेत. लॉकडाउन एकदम करणं हे जसं चुकीचं आहे तसंच लॉकडाउन एकदम उठवणंही चुकीचं ठरेल. हळूहळू सगळ्या गोष्टी आपण सुरु करतो आहोत. मात्र हे सगळं करत असताना स्वयंशिस्त पाळली जाणं अत्यंत गरजेचं आहे. जर शिस्त दिसली नाही, गर्दी झाली तर मात्र सगळं काही पुन्हा बंद करावं लागेल.
अर्थचक्र कसं चालणार यावर लक्ष
राज्यातलं अर्थचक्र कसं चालणार यावरही आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच ७५ ते ८० टक्के कापूस खरेदीचाही विचार आहे असंही त्यांनी सांगितलं. सध्याचा काळ हा राजकारण करण्याचा काळ नाही. सध्या आपण करोना नावाच्या संकटाशी लढा देतो आहोत. राजकारण तुम्ही सुरु केलं असलं तरीही आम्ही सुरु केलेलं नाही. राज्यावरचं संकट टाळलं जाणं जास्त महत्त्वाचं आहे. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.