मंगळवेढा (प्रतिनिधी) पंढरपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सर्वात जास्त उत्सुकता होती. ती म्हणजे काँग्रेस आघाडीच्या वतीने काँग्रेसकडून बी फाॅर्म देण्यात आलेले शिवाजी काळुंगे अर्ज माघार घेणार की नाही? याबाबत होती.त्याचा निर्णय झाला असून शिवाजी काळुंगे यांनी अर्ज माघारी न घेतल्याने जिल्ह्यात पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीच्या धोरणाला काँग्रेसकडूनच धक्का देण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
पंढरपूर 252 विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार भारत भालके यांनी उमेदवारी मिळवून पक्षाचा अधिकृत एबीफॉर्म भरल्यानंतर मंगळवेढ्यातील काँग्रेसचे जुने कार्यकर्ते शिवाजी काळुंगे यांना काँग्रेसकडून देखील एबीफॉर्म देण्यात आल्याने जिल्ह्यात राजकीय खळबळ झाली.
याचा परिणाम थेट सोलापूर मध्य मतदारसंघात झाला आणि प्रणिती शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून जुबेर बागवान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी दुपारी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार जुबेर बागवान यांनी आपला अर्ज पक्षाच्या आदेशानुसार माघारी घेतला. यानंतर पंढरपूर विधानसभा मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.
काँग्रेसकडून शिवाजी काळुंगे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतला जाईल असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र सुशीलकुमार शिंदे यांचे एकनिष्ठ समजले जाणारे शिवाजी काळुंगे हे काल रात्रीपासून नॉटरिचेबल असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज राहिल्याने पंढरपूर विधानसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस अशी तिरंगी लढत अटळ झाली आहे.
दरम्यान काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून शिवाजी काळुंगे यांना उमेदवारी माघारी घेण्याबाबत पत्र देण्यात आले होते. मात्र पक्षाच्या या पत्राला त्यांनी केराची टोपली दाखवल्याचे त्यांची उमेदवारी कायम राहिल्याने दिसून आले.