गावातील तरुणांचे डोळे हेच आमचे कॅमेरे - व.पो.नि.धनंजय जाधव स्वेरीत ‘पोलीस-विद्यार्थी मैत्री चषक’ हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१९

गावातील तरुणांचे डोळे हेच आमचे कॅमेरे - व.पो.नि.धनंजय जाधव स्वेरीत ‘पोलीस-विद्यार्थी मैत्री चषक’ हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन



पंढरपूर-(संतोष हलकुडे) ‘नागरिकांनी सर्वप्रथम आदर्श असलेल्या राज्य घटनेचा अभ्यास करावा कारण कायदा आणि सुव्यवस्था ही राज्यघटनेवर अवलंबून आहे. त्यामुळे  पोलीसांकडे नागरिकांनी थेट न्याय न मागता रीतसर तक्रार करावी. त्यानुसार तपास होतो आणि न्याय हा न्यायालयातून मिळतो. आज नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसी टिव्ही कॅमेरे बसविले जातात, परंतु पंढरपूर शहर आणि गावे यांच्यातील जवळपास पंच्याहत्तर हजार तरुणाचे प्रत्येकी दोन डोळे याप्रमाणे दीड लाख सीसी टिव्ही कॅमेरे शहर आणि गावावर नजर ठेवून आहेत. त्यामुळे गावातील अडचण, गडबड, गोंधळ, अवैध कामे या संबंधित माहिती पोलिसाना मिळते व तशी ती देण्यासाठी नागरिक नैतिक दृष्टया बांधील असले पाहिजे. व्यवस्थेत बदल होत असताना पोलिसांच्या कामकाजात देखील बदल होत आहेत. म्हणूनच ‘पोलीस काका आणि पोलीस दिदी’ या उपक्रमाची निर्मिती झाली आहे.’ असे प्रतिपादन पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले.
         स्वेरीच्या ग्राऊंडवर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे ‘पोलीस विद्यार्थी मैत्री चषक’ हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव हे मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे हे होते. पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी ‘पोलीसकाका’ आणि ‘पोलीस दीदी’ या संकल्पनेची सविस्तर माहिती देवून म्हणाले की, ‘व्हालीबॉल स्पर्धेच्या माध्यमातून ‘पोलीस आणि जनता’ यामधील असणारे अंतर कमी होणार आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे आणि पंढरपूर पोलीस उपविभागीय अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या नेतृत्वाखाली ‘पोलीस काका आणि पोलीस दिदी’ ही संकल्पना राबवीत आहोत. यामुळे ‘समाज आणि पोलीस’ यांच्यातील धागा आणखी मजबूत होवून समाज हा नेहमी पोलिसाच्या जवळ राहील.’ असे सांगून स्वेरीच्या सातत्याने करत असलेल्या सहकार्याबद्धल सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांचे आभार मानले. अध्यक्षस्थानावरून बोलताना स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे म्हणाले की, ‘समाजातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध वाढून मैत्री जपण्यासाठी आपसात सुसंवाद होणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच हा एक भाग म्हणून ‘पोलीसकाका’ आणि ‘पोलीस दीदी’ या संकल्पनेचा उदय झाला व ही संकल्पना राज्यभर आंमलात आणली जात आहे. हा उपक्रम स्तुत्य असून यासाठी पोलीस खात्याचे कौतुक केले पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी कायदा सुव्यवस्था भंग न करता पोलिसांच्या स्तुत्य कार्याला सहकार्य करावे. तसेच स्पर्धा म्हटले की हार-जीत ही होतच असते. स्पर्धेत जिंकलेल्या खेळाडूंनी अधिक जल्लोष न करता पराभूत संघाचे आभार मानले पाहिजे, तर पराभूत संघाने देखील पुढच्या स्पर्धेत आणखी दिमाखदार विजय मिळविण्याची तयारी केली पाहिजे. या कृतीतून खिलाडीवृत्ती दिसून येते.’ असे सांगितले. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा पहिला सामना स्वेरी, गोपाळपूर विरुद्ध कर्मयोगी, शेळवे यांच्यात खेळवला गेला. या कार्यक्रमासाठी  ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे, पंढरपूर तालुका व्हालीबॉल असोशिएशन संघाचे अध्यक्ष विष्णू शिंदे तसेच सामन्यासाठी रेफ्री म्हणून गोविंद मोहिते, विशाल मोहिते, माधव गायकवाड, प्रशांत गायकवाड, तानाजी माने यांच्यासह क्रीडा अधिकारी परिक्षक, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक तसेच स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, डिप्लोमा इंजिनिरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, सर्व अधिष्ठाता, क्रीडा विभागाचे रजनी वाघमोडे, प्रा. रामेश्वर सोलगे यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. हे सामने दोन दिवस चालणार असून यामध्ये बारा संघ सहभागी झाले आहेत. स्वेरी व्यवस्थापनाने आलेल्या संघांची उत्तम सोय केली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले. पो.नि. दयानंद गावडे यांनी मैदानाची पूजा करून सामन्याची पहिली सर्विस केली तर स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांनी देखील काहीकाळ हॉलीबॉलचा आनंद  लुटला.
छायाचित्र- स्वेरीमध्ये ‘पोलीस-विद्यार्थी मैत्री चषक’चे आयोजनात मार्गदर्शन करताना पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव सोबत स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे , पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे आदी.
test banner