आज महाराष्ट्रातील लाखो मराठ्यांच्या घरामध्ये जेवणाचं ताट समोर आलं की तोंडातला घास घशाखाली उतरत नाही,कारण डोळ्यासमोर उभी राहते ती आंतरवाली सराटी मधील मनोज जरांगे पाटलांची आकृती,त्यांची शरीरयष्टी,पांघरूण अंगावर घेऊन तक्क्यावर निपचित पडलेला चोळामोळा झालेला देह,माईक वर बोलताना थरथरणारा हात,बसलेला आवाज आणि डोळ्यात दिसणारी मराठा आरक्षणाची काळजी आत्ताच्या घडीला मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नापेक्षाही मनोज जरांगे पाटलांच्या जीवनाची सुरक्षितता लाखो मराठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
'सिर सलामत तो पगडी पचास' एक मनोज जरांगे पाटील असतील तर मराठ्यांच्या आरक्षणाचाच प्रश्न काय,पण भविष्यात मराठ्यांच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याची आशा जिवंत राहील खूप काळानंतर मराठ्यांच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे लढणारे नेतृत्व भेटलं आहे. याची प्रचिती अंतरवाली सराटी येथे दिनांक १४ अॅाक्टोंबर रोजी झालेल्या विराट सभेतून महाराष्ट्रालाच काय सबंध देशाला आली आहे त्यामुळे या नेतृत्वाची जपणूक तितकीच महत्त्वाची आहे.
चौरी चौरा येथील घटना घडल्यानंतर महात्मा गांधींनी ही काही कालावधीसाठी आंदोलन मागे घेतलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं आहे की लढायचं ते मरण्यासाठी नाही,तर लढायचं ते जिंकण्यासाठीच त्यासाठी वेळ पडली तर गनिमी काव्याने दोन पावलं मागे यायचे ते पुन्हा एकदा उसळून झेप घेण्यासाठी तिकडे आंतरवाली सराटी मध्ये अन्यपाण्याविना व वैद्यकिय सेवेविना आपला योद्धा लेकराबाळांच्या भविष्यकालीन कल्याणासाठी अहोरात्र आरक्षणासाठी झुंज देत आहेत.आमचा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर मराठ्यांच्या घराघरातील मनोज जरांगे कोलमडून पडतील,ते सैरभैर होतील,त्यांची आशा संपेल,ते निराशेच्या गर्तेत जातील,अविचाराची वाट धरतील,चुकीच्या मार्गाने पेटून उठतील मग त्या पेटलेल्या घराघरातल्या मनोज जरांगे पाटलांना कोणालाच थांबवता येणार नाही मग काय होईल याची कल्पनाही करता येणार नाही.
प्रत्येक मराठ्यांच्या घराच्या देव्हाऱ्यातील देव सुद्धा आता महत्त्वाचा राहिलेला नसून मनोज दादांच्या रूपात भेटलेला देवमाणसाला जपणं महत्त्वाचं झालं आहे.आदरणीय मनोज जरांगे पाटील तुमचा जीव आता एकट्याचा जीव राहिला नाही तुमचा जीव आता महाराष्ट्राचा जीव झालाय तुमच्या जिवात महाराष्ट्राचा जीव अडकलाय महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा समाजातील मुलांबाळांच्या उद्धारासाठी तुमचं जगणं महत्त्वाचं आहे मी आपणास सकल मराठा समाज मंगळवेढा तालुक्याच्या वतीने हात जोडून विनंती करतो की,काळजी घ्या,आत्तापर्यंत तुमचा शब्द म्हणजे अंतिम शब्दच म्हणून मराठा समाजाने शांततेच्या व शिस्तीच्या मार्गाने आंदोलन केले आहे आतामात्र तुम्ही समाजाचे ऐका आणि कमीत कमी पाणी तरी प्राशन करा जीवनात प्रामाणिकपणे संघर्ष करणाऱ्या प्रत्येकालाच तुम्ही हवे आहात....आरक्षणाची लढाई मराठ्यांना जिंकायची आहे पण ती तुमच्या सोबतच ! यासाठी मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक मराठा सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व भविष्यातही उभा असेल जय शिवराय.
एक मराठा लाख मराठा
प्रा विनायक मनोहर कलुबर्मे.
एक मराठा
सकल मराठा समाज मंगळवेढा तालुका.