सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेवर गुरुसेवा पॅनलचे वर्चस्व-संजय चेळेकर - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेवर गुरुसेवा पॅनलचे वर्चस्व-संजय चेळेकर

 



मंगळवेढा(प्रतिनिधी) सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून त्यामध्ये शिक्षक हितासाठी एकत्र येऊन उभा राहिलेल्या गुरुसेवा परिवाराच्या 'गुरुसेवा पॅनल' ने विरोधी स्वाभिमानी परिवर्तन आघाडीचा १९- ० ने धुव्वा उडवत पुनश्च एकदा पतसंस्थेवर सत्ता स्थापन केली.मागील पंचवार्षिक कालावधीत काटकसरीने केलेला कारभार, आश्वासनांची केलेली पूर्तता व पुढील योग्य 'रोड मॅप' यांच्या भरवश्यावर सभासदांनी गुरुसेवा पॅनलच्या पारड्यात मते टाकून पतसंस्थेच्या चाव्या योग्य व समर्थपणे कारभार करणाऱ्या उमेदवारांच्या हातात दिल्या असल्याचे मत नुतन संचालक संजय चेळेकर यांनी व्यक्त केले.

       प्रचारादरम्यान विरोधी स्वाभिमानी परिवर्तन आघाडीच्या 'सोशल मीडिया' टीमने नानाविध प्रकारे गुरुसेवा पॅनलचे नेते, उमेदवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.घोटाळ्याच्या नावाखाली बिनबुडाचे आरोप करत पतसंस्थेत फार मोठा भ्रष्टाचार झाल्याची आभासी प्रतिमा तयार करण्याचा चंग बांधला होता .परंतु, सभासद बंधू-भगिनींनी आपल्या पवित्र मताचे दान गुरुसेवा पॅनलच्या पारड्यात टाकून अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ पाहणाऱ्या अन् परिवर्तनाच्या नावाखाली स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून संचालक पदाची स्वप्ने पाहणाऱ्या वाचाळवीरांना चांगलाच धडा शिकवला आहे.तसेच फक्त निवडणुकीपुरते घराबाहेर पडून शिक्षकी राजकारण करता येत नाही तर त्यासाठी शिक्षकांच्या प्रत्येक अडी-अडचणींमध्ये, सुख-दुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं हे देखील यानिमित्ताने अधोरेखित झाले.मंगळवेढा तालुक्यातील सभासदांनी गुरुसेवा पॅनलच्या सर्वच उमेदवारांना ३०० पेक्षा जास्त मतदान केले असून शिक्षक नेते संजय चेळेकर यांना ५२८ पैकी ३६० मते देऊन पुन्हा एकदा तालुक्यातील शिक्षकांनी त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच जिल्हयातील ७०२७ पैकी ३७९८ जागरूक व स्वाभिमानी मतदार सभासदांनी संजय चेळेकरांना गेल्यावेळेस प्रमाणे याही वेळेस तिसऱ्या क्रमांकाची विक्रमी मते देऊन निवडून आणले.

          निवडणूक जाहीरनाम्यात गुरुसेवा पॅनलच्यावतीने दिलेल्या आश्वासनाकडे आम्ही वचन म्हणून पाहत असून त्या सर्वांची पूर्तता करण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ कटीबद्ध असल्याची ग्वाही विजयी उमेदवार संजय चेळेकर यांनी दिली आहे. सभासदांच्या हितासाठी व पतसंस्थेच्या विकासासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.सर्वांना सोबत घेत शिक्षक नेते श्री संभाजीराव थोरात , श्री बाळासाहेब काळे , श्री अंकुश काळे, श्री शिवानंद भरले व श्री मच्छिंद्रनाथ मोरे तसेच ज्येष्ठांचे मार्गदर्शन व सकारात्मक विचारांचे स्वागत करत यापूर्वीप्रमाणेच अगदी काटकसरीने व पारदर्शकपणे कारभार करण्याची हमी देखील त्यांनी यावेळी दिली.तसेच सभासदांनी दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभारदेखील यानिमित्ताने त्यांनी मानले. त्याचबरोबर गुरुसेवा पॅनलच्या विजयासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व बारा संघटनांच्या कार्यकर्ते,नेते व पदाधिकारी यांच्या मेहनतीला व प्रयत्नांना सलाम करत हा विजय त्यांना समर्पित करत असल्याचे त्यांनी सांगितले.

test banner