मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने असून दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना मैदानात उतरवलं. दोन्हीही उमेदवार तगडे असल्याने उत्सुकता निर्माण झालेली असतानाच भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. कारण आवताडे यांच्यासमोर आता त्यांच्या घरातूनच आव्हान उभं राहिलं आहे.
समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने समाधान आवताडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.सिद्धेश्वर आवताडेंनी समजूत काढण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. सिद्धेश्वर आवताडे यांच्या उमेदवारीमुळे समाधान आवताडेंसमोर मतविभागणीचे मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
सिद्धेश्वर आवताडे यांचाही मतदारसंघात चांगलाच संपर्क आहे. त्यांच्या ताब्यात मंगळवेढ्यातील अनेक ग्रामपंचायती, तसंच शेतकऱ्यांना पत पुरवठा करणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्यांवर त्यांचं वर्चस्व आहे. सिद्धेश्वर आवताडे निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने भाजपची मात्र अडचण निर्माण झाली आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने परिचारक आणि आवताडे गटाला एकत्र आणत अनोखी खेळी केली होती. २०१४आणि २०१९च्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले परिचारक आणि आवताडेंना एकत्र करीत भाजपने समाधान आवताडेंना निवडणूक रिंगणात उतरवलं. परिचारक आणि आवताडे गट एकत्र आल्याने भाजपला ही निवडणूक सोपी जाईल असे वाटत होते. मात्र आता समाधान आवताडे यांना घरातूनच आव्हान मिळाल्याने ही निवडणूक पुन्हा रंगतदार झाली आहे. दरम्यान, आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीत सिद्धेश्वर आवताडे यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे समाधान आवताडे यांना राजकीय विरोधकांच्या बरोबरच कौटुंबिक बंडखोरीचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये महेंद्र काशिनाथ जाधव (पीपल्स रिपब्लिकन पार्टी), नागेश भोसले (अपक्ष), मोहन नागनाथ हळणवर (अपक्ष), इलियास हाजीयुसूफ शेख (अपक्ष), संजय चरणू पाटील (अपक्ष), अमोल अभिमन्यू माने (अपक्ष), रामचंद्र नागनाथ सलगर (अपक्ष), मनोज गोविंदराव पुजारी (अपक्ष), बापू दादा मेटकरी (अपक्ष), अशोक ज्ञानदेव वाघमोडे (अपक्ष), रज्जाक ऊर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी (अपक्ष) या 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी भगीरथ भारत भालके (राष्ट्रवादी कॉंग्रेस), समाधान महादेव आवताडे (भारतीय जनता पक्ष), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), राजाराम कोंडीबा भोसले (बळिराजा पार्टी), सिद्धेश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी), बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, अभिजित वामनराव आवाडे-बिचुकले, सुनील सुरेश गोरे, सीताराम मारुती सोनवले, सिद्धेश्वर बबन आवताडे, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडुरंग मसुरे, बिरुदेव सुखदेव पापरे हे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
मतदान शनिवार, 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी रविवार, 2 मे 2021 रोजी होणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी या वेळी सांगितले.