महायुतीचे समाधान आवताडे तर महाविकास आघाडीचे भगिरथ भालके मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार ! पोटनिवडणुक चुरशीची होणार! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २८ मार्च, २०२१

महायुतीचे समाधान आवताडे तर महाविकास आघाडीचे भगिरथ भालके मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार ! पोटनिवडणुक चुरशीची होणार!

 



मंगळवेढा(प्रतिनिधी )पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून श्री संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समाधान आवताडे यांनी सोशल मिडियावर पक्षाचे आभार मानले आहेत. भाजपाकडून परिचारक की आवताडे रिंगणात असणार याची उत्सुकता संपली आहे.                                                      आ.प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडे यांना पाठिंबा देत निवडणूक एकदिलाने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींनी परिचारक व आवताडे यांच्यात मनोमिलन घडवून आणले आहे. यामुळे पोट निवडणूक महाविकास आघाडीचे भालके विरुद्ध भाजपचे समाधान आवताडे यांच्यात सामना रंगणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आला नसला तरी भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळणार असे जवळपास निश्चित मानले जात आहे. तसे भगीरथ भालके यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. समाधान आवताडे यांनी दोन विधानसभा निवडणुकीत चांगली टक्कर दिली होती. २०१४साली शिवसेनेकडून तर २०१९ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळेस समाधान आवताडे यांना ५५ ते ६० हजारच्या दरम्यान मते मिळालेली आहेत. दिवंगत आमदार भारत भालके यांच्यानंतर परिचारक गट प्रबळ मानला जातो. आता या निवडणुकीत परिचारक गट आवताडे यांच्या मागे राहील असे दिसते. यामुळे या पोट निवडणुकीत भालके यांच्यासमोर कडवे आव्हान उभा राहू शकते.

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा निवडणुकीत भालके, आवताडे यांच्यासह शैला गोडसे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, त्याच बरोबर वंचित बहुजन आघाडी, एम आय एम, धनगर समाज यांचेही उमेदवार रिंगणात असणार आहेत. यामुळे भालके यांच्यासाठी सुरुवातीला सोपी वाटणारी लढत अटीतटीची असणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाकडून आवताडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, प्रशांत परिचारक यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर  भालके यांचा अर्ज भरण्यासाठी देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते.

test banner