आषाढी वारीपासून सुरू झालेल्या मुख्यमंत्र्याच्या खेळयांनी तालुक्यातील राजकीय समीकरणे अस्थिर झाली होती. त्यातच मुख्यमंत्र्यांचा आमदार भारत भालकेंच्या जवळीकतेचा मुद्दा स्वकीयांच्या भुवया उंचवणारा होता. कारण भाजप मध्ये त्यांची प्रतिमा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्याच्या विठ्ठल पूजेला विरोध करणारा आमदार तसेच विधानसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणारा आमदार अशी झाली होती. त्यामुळे या तीर्थक्षेत्रातील लोकप्रिय बहुजन नेतृत्व आपल्या जाळ्यात कसे फसेल यासाठी तयारी सुरू होती. मीडिया मॅनेजमेंटच्या माध्यमातून तश्या हालचाली चालू झाल्या. विविध तर्क वितर्क मुद्दाम मांडले जावू लागले. शक्यतांचे इमले बांधू लागले. आज प्रवेश , उद्या प्रवेश , शब्द दिला वगैरे वगैरे
परंतु राजकीय डावपेचात तरबेज असणार्या भालकेंनी चपळतेने धोबीपछाड करत थेट सिल्वर ओक गाठले आणि हातात घड्याळ घेतले. त्यामुळे मतदार संघातील तरुणाईत उत्साह संचारला. सोशल मीडियात विषय ट्रेंडिंग झाला. सध्या महाराष्ट्रात मा. शरद पवारांचा झंझावात सुरू आहे तरुणाई आकर्षित होत आहे. त्यातच हा मतदार संघ पूर्वीपासून पवार साहेबांना मानणारा आहे. तसेच इथले सर्वच इच्छुक उमेदवार हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पवारांच्या छत्र छायेत घडलेले आहेत. आता पवारांच्या पडत्या काळात त्यांनाच विरोध करणारे हे उमेदवार जनतेलाही फारसे आवडणार नाहीत, असाच सुर सध्या दिसत आहे. त्यामुळे भालकेंना राजकीय गणिते जुळवायला मदतच होणार आहे.