मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी आणि रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री संत दामाजी पंतांच्या पालखी आगमनाने झाली.त्यानंतर प्राचार्य श्री सुधीर पवार यांच्या हस्ते श्री.विठ्ठल आणि श्री.रुक्मिणीमाता यांच्या मूर्तीचे पूजन आणि आरती करण्यात आली.
यावेळी बालचमूनी साकार केलेल्या या बालदिंडी आणि रिंगण सोहळ्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर,मुक्ताई,संत तुकाराम,संत एकनाथ,संत नामदेव ,संत जनाबाई या सर्व संतांची मांदियाळीच जणू शाळेत एकत्रित सर्वांना पाहायला मिळाली.कमरेवरती हात ठेवून विठुरायाचे ते सावळे,सुंदर,मनोहर आणि साजिरे स्वरूप त्याचबरोबर रुक्मिणी मातेचे ते अलौकिक रूप पाहून साक्षात पंढरी शाळेत अवतरल्याचा भास सर्वांना होत होता.प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची भगवी पताका हातात घेऊन , डोक्यावर तुळस आणि टाळ मृदुंगाच्या ठेक्यात विठू नामाच्या गजराने रिंगण सोहळ्यातील नुत्याविष्काराने सर्व परिसर दुमदुमून सोडला.मानवी रुपात साकारलेले विठ्ठल-रूखमाई आणि सोबतच सर्व संतांचे दर्शन,रिंगण,फुगडी,पावली,अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण व वैविध्यपूर्ण पारंपरिक खेळांनी आणि अभंग व भक्तीगीत आणि समूह नृत्याने बालचुमुंनी सर्वांची मने वेधून घेतली.
ज्ञान,विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून बालमनावर केले जाणारे संस्कार भारताचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्राचार्य श्री. सुधीर पवार यांनी सांगितले.तसेच वारी परंपरा ही ८०० वर्षांपासून सुरू असून साधारणपणे १६८५ मध्ये याची सुरुवात झाली आणि सर्व संतांची शिकवण आपण आपल्या आचरणात आणली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
आणि विदयार्थ्यांच्या उस्फूर्त सहभागाबद्दल त्यांचे कौतुक केले.
सदर बालदिंडीचे आणि रिंगण सोहळ्याचे नियोजन ज्येष्ठ शिक्षक श्री. लक्ष्मण नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री. मंगेश केकडे यांनी केले.आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.