मंगळवेढा:-
गुरुवारी पहाटे वारी परिवार सायकल क्लबचे सदस्य परमेश्वर पाटील,चंद्रकांत काकडे,प्रा.विनायक कलुबर्मे व सतिश दत्तू नेहमी प्रमाणे सायकलिंगचा सराव करण्यासाठी बेगमपुरपर्यंत गेले असता येताना हॉटेल रुद्र समोर वाटेत एक बगळा पायाला जबर मार लागल्यामुळे जखमी अवस्थेत रस्त्यावरती पडला होता आणखी काही वेळाने तो पक्षी राहिलाही नसता अशावेळी संत भूमितील या तरुणांनी संताच्या विचारांची कास धरत बगळा जखमी अवस्थेत आढळल्यानंतर वारी परिवाराच्या सदस्यांनी त्याची दखल घेतली आणि त्वरित पक्ष्याला मदत मिळावी आणि त्याच्यावर योग्य उपचार व्हावेत या उद्देशाने त्यांनी पुढाकार घेत मंगळवेढ्यातील शासकीय पशुवैदिकीय दवाखान्यात दाखल केले परंतु सकाळी दवाखाना बंद असल्यामुळे वारी परिवाराचे दिलीप आडसुळ यांनी तो जखमी पक्षी आपल्याकडे ठेवून घेतला आणि दवाखाना उघडता क्षणी दवाखान्यात दाखल केले तेथे डॉ.लिगाडे यांनी योग्य ते उपचार केले असता सदर बगळ्याला मंगळवेढ्यातील कृष्ण तलावात सोडण्यात आले.
तेव्हा तो स्वतः निसर्गाच्या सानिध्यात उडून गेला तेव्हा खरोखरचं आपण एका पक्षाचा जीव वाचवू शकलो याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि केलेल्या कार्याचे चीज झाले असे वाटू लागले मुक्या जीवाप्रती दाखवलेली ही संवेदनशीलता समाजासाठी खरोखरचं प्रेरणादायी आहे.
मंगळवेढ्यातील माणुसकी केवळ माणसांपुरती मर्यादित नसून, मुक्या प्राण्यांप्रती आणि पक्ष्यांप्रती असलेली संवेदनशीलताही तितकीच महत्त्वाची आहे.याच भावनेतून मंगळवेढा येथील वारी परिवाराने जखमी अवस्थेत आढळलेल्या बगळ्याला मदतीचा हात देत त्याला जीवदान देण्याचा प्रयत्न केला.
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा मुक्या प्राण्यांकडे आणि पक्ष्यांकडे दुर्लक्ष केले जाते.मात्र,निसर्गातील प्रत्येक जीवाचे स्वतःचे महत्त्व आहे.
पक्षी आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे,असा संदेशच या सायकल स्वारांनी दिला आहे मुक्या जीवांवर दया करणे,संकटात सापडलेल्या पक्ष्यांना मदत करणे आणि निसर्गाचे संवर्धन करणे,हीच खरी माणुसकी आहे वारी परिवाराच्या या कार्याचे पक्षीप्रेमींकडून कौतुक होत आहे.

